Devendra Fadnavis Maharashtra Rain: राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये झालेल्या अतिवृष्टीने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी मृत्यू झाले आहे. पिके वाहून गेली आहेत. अनेक गावांना पूराचा वेढा पडला असून, ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. याचसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.
मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "ओला दुष्काळ काय, याठिकाणी जे काही नुकसान झाले आहे; त्याकरिता जेवढ्या पद्धतीची मदत आपल्या नियमांमध्ये आहे, ती सगळी मदत आम्ही देऊ. खरडून गेलेल्या जमिनीकरिता आपला शासन निर्णय आहे. तातडीची मदतही आपण करतो आहोत."
हेलिकॉप्टरसाठी लष्कराशी चर्चा
"राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे. काही भागामध्ये पूरपरिस्थितीमुळे लोक अडकली आहेत. बीडमध्ये मदत मोहीम सुरू आहे. धाराशिवमध्येही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. २७ लोकांना एनडीआरएफच्या लोकांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढले आहे. २०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अतिरिक्त हेलिकॉप्टरची मागणी केली आहे. लष्कराशी बोलून हेलिकॉप्टर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे", अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
पुरामुळे आठ लोकांचा मृत्यू
"अहिल्यानगर, सोलापूर, बीड, जळगाव, परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. १० लोक जखमी आहेत. आता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या १७ तुकड्या या भागांमध्ये मदत करत आहेत", अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
२ हजार २१५ कोटींची मदत, आठ दहा दिवसात पैसे जमा होतील
"मागच्या काळात शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले, त्याचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. यावेळी एकत्रित पंचनामे आल्यावर मदत करण्याऐवजी जसे पंचनामे येतील, तशी मदत करत आहोत. त्यामुळे आतापर्यंत ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना २ हजार २१५ कोटी रुपयांची मदत करण्याचे शासन निर्णय काढले आहेत. यातील १८२९ कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाही झाले आहेत. पुढच्या आठ-दहा दिवसात पैसे जमा होतील", असे मुख्यमंत्री म्हणाले.
"अजूनही पाऊस पडतो आहे. त्याठिकाणचे पंचनामे करणे आणि मदत करणे, हे काम सुरूच राहणार आहे. त्यामुळे एखाद्या जिल्ह्यात आता कमी पैशांची मदत दिसत असली, तरी तेथील काम सुरू आहे. एका तालुक्याचा अहवाल आला, तर त्या तालुक्याला मदत करायची असे धोरण ठरवले आहे. तातडीने मदत मिळावी म्हणून हे ठरवले आहे", असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुख्यमंत्री करणार दौरा
"मंत्रिमंडळ बैठकीत कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती आहे, याचा आढावा आम्ही घेतला आहे. उद्या पालकमंत्र्यांना किंवा सगळ्या मंत्र्यांना या पूरग्रस्त भागामध्ये भेटी देण्यास सांगितले आहे. मी स्वतःही काही भागांमध्ये जाणार आहे. फक्त आमचा प्रयत्न असा असणार आहे की, जिथे मोठ्या प्रमाणात मदत कार्य सुरू आहे, त्यावर कुठला ताण येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे. तसेच आमचे दौरे असतील. परिस्थिती समजून घेऊन अधिक मदत काय करता येईल. उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याला अधिकचा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या वतीने केला जाईल", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.