सीएसटीवर लवकरच वायफाय
By Admin | Updated: April 1, 2015 04:16 IST2015-04-01T04:16:03+5:302015-04-01T04:16:03+5:30
लाखोंच्या संख्येने सीएसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा आणि मोफत मिळावे, या

सीएसटीवर लवकरच वायफाय
मुंबई : लाखोंच्या संख्येने सीएसटी स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना आपल्या मोबाइलवरील इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा आणि मोफत मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वायफाय सुविधा देण्यात येणार आहे. याची सीएसटी स्थानकात सध्या चाचणी सुरू असून, ती अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच ही सुविधा प्रवाशांच्या मोबाइलवर उपलब्ध होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. प्रवाशांना त्यांच्या मोबाइलवर वायफाय सुविधा अर्धा तास फ्री मिळणार आहे.
सध्या मोबाइल अॅपचा काळ असून, अनेकांच्या हाती मोठमोठ्या कंपन्यांचे अँड्रॉइड फोन असतात. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर लाखोंच्या संख्येने वावरणारे प्रवासीही अँड्रॉइड फोन हाताळताना दिसतात. या फोनमध्ये असणारी इंटरनेट सुविधा ही प्रवाशांसाठी सोयीची ठरते आणि त्याचा वापरही अधिक होताना दिसतो. परंतु स्थानकांवर किंवा लोकलमध्ये नसलेल्या वायफाय सुविधेमुळे कधी कधी इंटरनेट कनेक्शनमध्येही समस्या निर्माण होते. हे पाहता प्रवाशांना इंटरनेट कनेक्शन विनाअडथळा मिळावे आणि तेही मोफत, यासाठी सीएसटीसारख्या गर्दीच्या स्थानकावर वायफाय सुविधा देण्याचा निर्णय झाला आहे. रेल्वेकडून वायफाय कनेक्शनसाठी लागणारे राऊटर्स बसविण्यात आले आहेत. या राऊटर्सची संख्या जवळपास २५ असल्याचे सांगण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात हे राऊटर्स बसविण्यात आले असून, त्यानंतर त्याची चाचणी सुरू करण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यास लवकरच वायफाय सुविधा प्रवाशांच्या सेवेत येईल, असे सांगण्यात आले. पहिल्या अर्ध्या तासासाठी ही सेवा प्रवाशांना मोफत मिळेल आणि त्यानंतर शुल्क आकारणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे वायफायच्या वापरासाठी शुल्क आकारणी करतानाच २५ रुपयांपुढील किमतीची कूपन्सही विकली जातील. दिल्लीतील रेल्वे स्थानकावर १५ मिनिटेच वायफाय फ्री मिळते. त्यापेक्षा जास्त वेळ फ्री वायफाय सीएसटी स्थानकावर प्रवाशांना दिले जाईल. ही वायफाय सुविधा रेल नेटमार्फत दिली जाणार आहे. (प्रतिनिधी)