बीडमध्ये ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे !
By Admin | Updated: August 19, 2016 19:03 IST2016-08-19T19:03:48+5:302016-08-19T19:03:48+5:30
पंधरा दिवसापूर्वी गाजावाजा करत बीड शहराला नगरपालिकेने वाय-फाय शहर बनवल्यानंतर आता ज्या परिसरात वाय-फाय रेंज मिळते, त्या भागात ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे तयार झाले आहेत

बीडमध्ये ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे !
प्रताप नलावडे
बीड - पंधरा दिवसापूर्वी गाजावाजा करत बीड शहराला नगरपालिकेने वाय-फाय शहर बनवल्यानंतर आता ज्या परिसरात वाय-फाय रेंज मिळते, त्या भागात ठिकठिकाणी वाय-फाय कट्टे तयार झाले आहेत. तरूण मंडळी हातात मोबाईल घेऊन याठिकाणी घोळक्याने तास न् तास ठिय्या मारताना दिसत आहेत.
नगरपालिकेने शहरातील काही भागात मोफत वाय-फाय सेवा सुरू केली असून हळू- हळू संपूर्ण शहरात ही सेवा मिळणार आहे. सध्या शहरातील बशीरगंज, मोमीनपूरा, अहिल्याबाई चौक, माळी वेस, नगर रोड आदी परिसरात वाय-फाय सेवा मिळत आहे. यामुळे या परिसरात शहरातील विविध भागातून तरूण मंडळी येवून घोळक्याने कारंजाच्या कट्यावर, बंद दुकानांच्या समोर, हॉटेलात आणि अगदी रस्त्याच्या कडेलाही घोळक्याने थांबू लागले आहेत. हातात मोबाईल आणि मोबाईलवर सर्चिंग सुरू, असे चित्र आता या परिसरात नित्याचे झाले आहे.
सतत तरूण मुलांचा घोळका थांबू लागल्याने वैतागलेल्या मोमीनपुऱ्यातील नागरिकांनी वाय-फाय कनेक्टीव्हिटीचा बॉक्सच तोडून टाकल्याची घटनाही ताजीच आहे. सध्या एका मोबाईल धारकाला तीस मिनिटांपर्यंत मोफत वाय-फाय सुविधा मिळत आहे.
पूर्वी शहरातील चौका-चौकात तरूणांचे गप्पांचे फड रंगायचे. चर्चा व्हायच्या. गप्पा-गोष्टी चालायच्या. परंतु आता वाय-फाय शहरातील हे चित्र बदलू लागले आहे. एकत्र घोळक्याने बसलेली ही तरूणाई एकमेकाशी बोलण्याऐवजी हातातील मोबाईलवर सर्फिंग करण्यात दंग होऊन जाताना दिसते.