का तुटतोय जीवनाचा धागा?
By Admin | Updated: November 10, 2014 01:04 IST2014-11-10T01:04:49+5:302014-11-10T01:04:49+5:30
उपराजधानीत फुलत असलेल्या प्रेम संबंधाबरोबरच प्रेमवीरांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रेमभंग आणि कौटुंबिक विरोधामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये ९५ जणांनी आत्महत्या केल्या.

का तुटतोय जीवनाचा धागा?
प्रेमवीरांच्या आत्महत्या वाढत आहेत
राहुल अवसरे - नागपूर
उपराजधानीत फुलत असलेल्या प्रेम संबंधाबरोबरच प्रेमवीरांच्या आत्महत्यांचे प्रमाणही वाढत आहे. प्रेमभंग आणि कौटुंबिक विरोधामुळे गेल्या पाच वर्षांमध्ये ९५ जणांनी आत्महत्या केल्या.
ही माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालांवरून प्राप्त झाली. बेरोजगारीची भयावह समस्या असताना तरुण स्वत:ला गुलाबी प्रेमात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊन हे प्रेमवीर मृत्यूला कवटाळत आहेत.
प्राप्त आकडेवारीनुसार २०१३ मध्ये १५ प्रियकर आणि ६ प्रेयसी, अशा २१ जणांनी आत्महत्या केली. २०१२ मध्ये सर्वाधिक ३१ प्रेमवीरांनी आत्महत्या केली. त्यात १७ प्रियकर आणि १४ प्रेयसींचा समावेश होता. २०११ मध्ये १४ प्रियकर आणि २ प्रेयसींनी, २०१० मध्ये प्रत्येकी ७ प्रियकर आणि प्रेयसींनी तर २००९ मध्ये ७ प्रियकर आणि ६ पे्रयसींनी आत्महत्या केली.
याउलट बेरोजगारीला कंटाळून २०१३ मध्ये ४, २०१२ मध्ये १८, २०११ मध्ये १०, २०१० मध्ये १५ आणि २००९ मध्ये १८ जणांनी आत्महत्या केली. बेरोजगारीच्या कारणापेक्षा प्रेम प्रकरणातून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
माध्यमांचा स्वैर वापर
मोबाईलसारख्या इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या स्वैर वापरातून उपराजधानीत प्रेमीयुगुलांमधील प्रेम फुलत आहे. अँड्राईड मोबाईलवरील ‘व्हाटस् अप’, फेसबुक आणि अन्य सोशल नेटवर्क प्रेमीयुगुलांना जवळ करीत आहेत. त्यामुळेच चेहरे लपवून मोटारसायकलींवर , सुनसान ठिकाणी आणि बगिच्यात युगुलांची वाढलेली गर्दी दिसत आहे. अचानक दगाबाजी आणि कुटुंबाचा विरोध यातून प्रेमभंग झाला की, मती कुंठीत होते, सारासार विचार करण्याची शक्ती संपुष्टात येते त्यामुळे प्रियकर किंवा प्रेयसी आयुष्याचा शेवट करतात. प्रियकराच्या आत्महत्येचे प्रमाण ५६ टक्के तर प्रेयसीच्या आत्महत्येचे प्रमाण ४४ टक्के आहे. अर्थात प्रियकरापेक्षा प्रेयसीमध्ये भावनिक स्थिरता अधिक असल्याने प्रियकराच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक आहे.
कौटुंबिक विरोधातून आत्महत्या अधिक
प्रेमीयुगुल आपल्या बहुमोल जीवनाचा अचानक अंत का करून घेतात यामागील कारण जाणून घेण्यासाठी प्रस्तुत प्रतिनिधीने प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले की, जातीय, धार्मिक, वर्ण, वयातील तफावत आणि ‘मिस मॅच्ड’ या कारणांमुळे घरातील लोकांचा विरोध होतो. हा विरोध झाल्याने प्रेमीयुगुल, अशा प्रकारची पावले उचलून स्वत:चा शेवट करतात. मिस मॅच्ड म्हणजे उच्चशिक्षित श्रीमंत घराण्यातील मुलीने किंवा मुलाने कमी शिक्षित ‘लेबर’ काम करणाऱ्या मुलाच्या किंवा मुलीच्या प्रेमात पडणे होय. या संबंधाला घरातून प्रचंड विरोध होतो. प्रेमभंगातून होणाऱ्या आत्महत्येमागे निश्चितच मानसिक आजार असतो, अशा लोकांचे समोपदेशन करून त्यांच्यावर मानसोपचार करून काही तरी तोडगा निघू शकते, असेही डॉ. जोशी म्हणाले.