सावंत, पंकजा, विखे, मुंडेंबाबत मौन कशासाठी

By Admin | Updated: September 20, 2016 03:38 IST2016-09-20T03:38:54+5:302016-09-20T03:38:54+5:30

कुपोषणाची दाहकता कमी झालेली दिसून येत नसून आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा पुरते अडचणीत आले आहेत.

Why silence for Sawant, Pankaja, Vikhe, Munda? | सावंत, पंकजा, विखे, मुंडेंबाबत मौन कशासाठी

सावंत, पंकजा, विखे, मुंडेंबाबत मौन कशासाठी

हितेन नाईक,
पालघर- मोखाड्यामधील वावर वांगणीतील कुपोषणाच्या घटने नंतर आज २१ वर्षा नंतरही या भागातील १२ कुपोषित बालकांच्या मृत्यूमुळे कुपोषणाची दाहकता कमी झालेली दिसून येत नसून आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री विष्णू सवरा पुरते अडचणीत आले आहेत. सागर वाघ यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी गेलेल्या सवरा यांच्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना कोंडीत पकडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असताना या कुपोषणाला तितकेच जबाबदार असलेले आरोग्यमंत्री, दीपक सावंत, महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडे व स्थानिक प्रशासनाकडे मात्र सोईस्कर डोळेझाक केली जात असल्याचा आरोप सवरांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
कुपोषणामुळे सध्या चर्चेचा विषय बनलेल्या मोखाडा तालुक्यातील ईश्वर सागर चा मृत्यू झाला ते खोच गाव विद्यमान आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी ते विरोधी पक्षाचे आमदार असताना दत्तक घेतले होते. या दत्तक घेतलेल्या गावातच ईश्वर सावरा सह दोन बालकांचा मृत्यू व्हावा, तसेच या दत्तक योजनेचे पुढे काय झाले? याचा जाब विचारण्याचे धारिष्ट्य अजूनही कुणाला झाल्याचे दिसून येत नाही. कुपोषणाने ६०० बळी घेतल्यानंतर पालकमंत्र्यांना जबाबदार धरून जाब विचारला जाणे हे रास्तच आहे. मात्र त्यांच बरोबरीने आरोग्य खाते, ग्रामीण, महिला बालविकास खात्याची बेपर्वाई देखील याला जबाबदार आहे. या विभागानेही या बालमृत्यूची जबाबदारी स्वीकारावी अशी मागणी आता होत आहे. सध्या मोखाड्यात ४९३ तीव्र आणि अति तीव्र कुपोषित बालके मृत्यूच्या दाढेत असताना त्यांचा टाहो अवघ्या ९० किमी अंतरावरील मंत्रालयात बसलेल्या मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचू नये या बाबत अनेकस्तरावरून टीका होत आहे. आजही या कुपोषित बालकाच्या उपचारासाठी आणि नियोजनासाठी अत्यावश्यक असलेल्या पालघर जिल्ह्यातील बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांच्या १३ पैकी १२ जागा रिक्त असल्याने व जिल्ह्यात कुपोषित बालकांच्या आहारासाठी सुरु असलेली ‘अमृत आहार योजनेला’ निधीच उपलब्ध नसल्याच्या कारणाने बंद असल्याने शासन कुपोषणाबाबत किती बेफिकिरीने वागत आहे हे दिसून येते.
हा तर ठरवून टार्गेट करण्याचा प्रकार
कुपोषण, ढिसाळ आरोग्य सेवा, रोजगार निर्मिती मधील अपयश इ, गंभीर प्रश्ना बाबत स्थानिक ग्रामस्थ, विविध संघटना मध्ये असंतोष खदखदत असेल तर तो एकट्या आदिवासी मंत्र्यावरच का निघावा? त्या दगावलेल्या कुपोषित बालकांना योग्य आरोग्य सेवा, आहार पुरविणे, त्यांच्या मातांना सकस आहार, औषधे पुरवणे, तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्यांची तपासणी करून घेणे, त्यांच्या कुटुंबाला आपल्या जवळपास रोजगाराची निर्मिती करून देणे इ. कामासाठी पालकमंत्र्यासह आरोग्यमंत्री दिपक सावंत, ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे , मुख्यमंत्री, स्थानिक पंचायत समिती यांचीही सामूहिक जबाबदारी असताना पालकमंत्र्यांना ठरवून सुपारी घेतल्यागत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न काही लोक कारीत असल्याचे मत विष्णू सवरा यांच्या निकटवर्तीयांनी लोकमत कडे व्यक्त केले.
>काय आहे सवरा समर्थकांचे म्हणणे?
जमीन घोटाळा आणि इतर कारणांचा ठपका ठेवीत माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना महसूलमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
त्यांना हटविण्या मागे त्यांच्याच पक्षातील एक फळी कार्यरत असल्याचा आरोप केला जात असताना आता आदिवासी मंत्री विष्णू सवरा यांनाही मंत्री पदावरून हटविण्याची पद्धतशीर खेळी खेळली जात असल्याची चर्चा पालघर जिल्ह्यात सुरु आहे. सवरांना ज्या कुपोषणाच्या मुद्यावर सोईस्कर घेरले जात आहे. अशावेळी त्या गोष्टींना जबाबदार असलेल्या काहींना मात्र त्याचा थेट सबंध असतानाही बेमालूमपणे वाचविले जात आहे.
त्यामुळे पालकमंत्र्यांच्याच विरोधात निघणारा हा असंतोष म्हणजे आदिवासींच्या नावाने चालविणाऱ्या बिगर आदिवासीचे कारस्थान असून एका प्रकारे सुपारी घेऊन केलेले हे कृत्य आहे असा आरोप सवरांच्या निकटवर्तीयांमधून केला जात आहे.
>काही संघटनाना आमच्या पालकमंत्र्यांची बदनामी करण्याचीच जबाबदारी दिल्याचे दिसते. ज्या आदिवासींच्या जीवावर ते पाच वेळा निवडून आलेत, ते स्वत: आदिवासी असताना मृत बालका विरोधात असे कधीही बेछूट बोलणार नाहीत. - पास्कल धनारे, आमदार
कुपोषण, बालमृत्यूला एकटे पालकमंत्रीच जबाबदार आहेत का? इतर विभाग ही याला जबाबदार आहेत. आदिवासी विकास विभागाकडून फक्त फंड पुरविले जाते. तो त्यांनी वेळोवेळी पुरवला आहे. स्थानिक नोडल एजन्सी पंचायत समिती, मोखाड्यावर शिवसेनेची सत्ता आहे. आरोग्य मंत्री शिवसेनेचे आहेत. महिला बालकल्याण विभागाचीही त्यांला जबाबदार असताना त्यांनी काय उपाय योजना आखल्यात त्याबाबत कोणी त्यांना जाब विचारत का नाहीत? - बाबाजी काठोळे, सदस्य (भाजपा प्रदेश कार्यकारणी )
>यासाठी ठेवले स्थानिक पत्रकारांना दूर ?
नुकत्याच मोखाड्यातील मध्य वैतरणा प्रकल्प नामकरण कार्यक्र मादरम्यान आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी कुपोषणग्रस्त व आरोग्य सेवेबाबत एका शब्दाचाही उल्लेख केला नाही.
उदघाटन कार्यक्रमादरम्यान स्थानिक पत्रकार कुपोषण, आरोग्य सेवा, पालघर जिल्ह्यातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आश्वासने फसवी निघाल्याचा जाब विचारतील म्हणून स्थानिक पत्रकारांना दोन्ही मान्यवरांपासून पद्धतशीरपणे रोखून धरण्यात आल्याने पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध ही व्यक्त केला होता.
अलीकडेच आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनीही मोखाड्याला भेट देताना आश्वासना पलीकडे कुपोषणग्रस्तांच्या झोळीत काही विशेष टाकलेली नसतांना आणि हे सर्व मान्यवर आदिवासीमंत्र्या इतकेच जबाबदार असताना त्यांच्या विरोधात मात्र कुठलेही आंदोलन छेडण्यात का आले नाही? असेही मते व्यक्त केले जात आहे.

Web Title: Why silence for Sawant, Pankaja, Vikhe, Munda?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.