विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ का करीत नाही?
By Admin | Updated: November 28, 2014 01:06 IST2014-11-28T01:06:08+5:302014-11-28T01:06:08+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने

विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ का करीत नाही?
विद्वत परिषद बैठक : सदस्यांनी प्रशासनाला धरले धारेवर
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा दर्जा सातत्याने घसरत असून, विद्यार्थी मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेत आहेत. ही स्थिती बदलण्यासंदर्भात प्रशासनाने ठोस पावले तातडीने उचलण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात विचार करून ठोस भूमिका तयार करून विद्यापीठाचे ‘मार्केटिंग’ करण्याची आवश्यकता असल्याचा सूर विद्वत परिषदेच्या बैठकीत उमटला. गुरुवारी झालेल्या बैठकीत निरनिराळ्या मुद्यांवर सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.
नागपूर विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालये व त्यातील अभ्यासक्रम बंद करण्याचे २५ ते ३० प्रस्ताव विद्यापीठासमोर आले आहेत. विद्यापीठात विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने रोडावते आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून काहीच ठोस पावले उचलण्यात येत नसल्याने, हे प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यापीठ केवळ पदव्या देण्यासाठी नाही तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे मत डॉ. प्रमोद येवले यांनी व्यक्त केले. डॉ. बबन तायवाडे यांनी विद्यार्थीसंख्या घटण्याची समस्या संपूर्ण राज्यभरात आहे. त्यामुळे मुंबई-पुण्याकडे विद्यार्थी का जातात याचा अभ्यास आवश्यक आहे, अशी सूचना केली.
उच्चशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.डी.बी.पाटील यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर जोरदार टीका केली. महाविद्यालयांना मान्यता प्रदान करताना तेथे पायाभूत सुविधा आहेत का, याचा विचार विद्यापीठ करते का? क्षमता मूल्यमापनाशिवायच बृहत् आराखडा का बनतो? महाविद्यालयांची व विद्यापीठाची ही दयनीय स्थिती विद्यापीठानेच निर्माण केली आहे. महाविद्यालयांची संख्या एखाद्या चक्रीवादळासारखी वाढत गेली तर असेच चित्र दिसेल, या शब्दात पाटील यांनी विद्यापीठावर ताशेरे ओढले.(प्रतिनिधी)
प्रणालीतच समस्या
यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे यांनी विद्यापीठाच्या प्रणालीतच समस्या आहेत, अशी कबुली दिली. विद्यापीठात आजघडीला असंख्य समस्या आहेत. या समस्यांचा तोडगा सदस्यांनी सुचवावा, यासाठी कुठल्याही ‘अजेंडा’ न ठेवता बैठक बोलविण्याची गरज आहे. प्राधिकरणांत अनेकदा समस्यांचे निवारण होत नाही, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.