Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:20 IST2025-11-03T13:17:02+5:302025-11-03T13:20:56+5:30
१ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होतील त्या महाराष्ट्रातील तरुणांना मतदानाचा का अधिकार नाही? असा प्रश्न ठाकरेंनी विचारला आहे.

Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
मुंबई - मतदार यादीत सुधारणा करा तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नका अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयुक्तांकडे केली आहे. त्याशिवाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शिवसेना शाखेत मतदार ओळख केंद्र उभारली जातील. तिथे मतदारांनी यावे, नावाची खातरजमा करावी जेणेकरून काही चुकीचे असेल तर तात्काळ त्याची दखल घेता येईल असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
मातोश्रीवरील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, मतचोरीबाबत परवा जो मोर्चा झाला तो प्रचंड मोठा होता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच सर्व पक्ष एकत्र येत त्यांनी निवडणूक आयोगाला जाब विचारला आहे. आता आम्ही मतदार ओळख केंद्रे आमच्या शाखेत सुरू करतोय. १० तारखेला मतदार यादी प्रसिद्ध होईल. त्यानंतर पुढच्या आठवड्यात आक्षेप स्वीकारले जातील. सक्षम नावाचे APP आणि निवडणूक आयोगाचा सर्व्हर आयोगाकडून हाताळले जात नाही असा आमचा संशय आहे. मतदानातून नाव वगळलं गेले तर निवडणुकीच्या दिवशी मतदान करता येणार नाही. कुणीतरी माझ्या नावाने अर्ज केला, त्यानंतर माझ्यासह कुटुंबातील नावे वगळण्याचा डाव कुणीतरी आखला होता. त्यामुळे आम्ही आमच्या शाखेतून मतदारांच्या सोयीसाठी केंद्रे उभारत आहोत. मतदार यादीत नाव आहे की नाही ते नागरिकांनी शाखेत येऊन तपासावे. निवडणूक आयोगाची भुताटकी आहे. एका एका घरात ४०-५० नावे नोंदवली आहेत. त्यामुळे आपल्या परवानगीशिवाय राहणारी माणसं घरात राहत नाही ना याचा शोध मतदारांनी घ्यावा असं त्यांनी म्हटलं.
तसेच निवडणूक आयोगाने १ जुलैपर्यंत नोंदणी असलेली नावे मतदार यादीत ठेवली आहे. १ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होईल त्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. मात्र याच वयातील मुले जगभरात रस्त्यावर उतरून क्रांती करत आहेत. मग हे सरकार Gen Z युवकांना का घाबरतंय.. लोकसभा ते विधानसभा या कालावधीत ४५ लाख मतदार यादीत घुसवले गेले असं निर्मला सीतारामन यांच्या पतीने सांगितले होते. हे मतदार कुणी घुसवले होते, १ जुलैनंतर ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण होतील त्या महाराष्ट्रातील तरुणांना मतदानाचा का अधिकार नाही? म्हणून या मुलांनीही आमच्या शाखेत येऊन नाव नोंदवावे, किती लाख युवक मतदानापासून वंचित राहतील हेदेखील आपल्याला कळेल असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, निवडणूक आयुक्ताला आम्ही पत्र दिले आहे. जोपर्यंत मतदारांची सुधारित यादी तयार होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत अशी आमची मागणी आहे. निवडणूक घेऊ नका असं आम्ही म्हणत नाही तर सदोष मतदार यादी प्रसिद्ध करावी. भ्रष्ट मार्गाने निवडणूक होऊ नये हीच आमची मागणी आहे अशी माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांची कर्जमुक्ती झालीच पाहिजे
कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे. अतिवृष्टीनंतर केंद्रीय पथक २ दिवसांच्या पाहणीसाठी येत आहे. २ दिवसांत संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्राचा दौरा करणार कसा, त्यानंतर प्रस्ताव पाठवला जाईल. राज्य सरकारने अद्याप कुठलाही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही. पीकविम्याचे पैसे म्हणून शेतकऱ्यांना काही ठिकाणी २ रूपये दिले आहेत. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आता कर्जमाफीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरला, त्याला ३० जूनचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. मग आता डोक्यावर जे कर्ज आहे त्याचे हफ्ते भरायचे की नाही हा प्रश्न आहे. बँकांचा फायदा होईल म्हणून कर्जमाफी करत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात मग जूनमध्ये कर्जमाफी केली तर त्याचा फायदा बँकांना कसा मिळणार नाही याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे अशी मागणी करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
सोबतच मी मुख्यमंत्री असताना राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाख कर्ज माफ केले होते. महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा दुसरा टप्पा सरकार आता का जाहीर करत नाही. या योजनेचा डेटा आहे त्यात सुधारणा असेल तर करा. आम्ही कुठलीही कमिटी नेमली नाही. शेतकऱ्यांचे कर्ज प्रामाणिकपणे कमी केले. मी मराठवाड्यात शेतकरी संवाद दौऱ्यावर जाणार आहे. दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळणार हे सांगितले होते. ते मिळाले की नाही हे शेतकऱ्यांना विचारणार आहे. ज्यांची जमीन खरडून गेलेली आहे त्यांचे काय हा मोठा प्रश्न आहे. दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळाली का हीदेखील विचारणा करणार आहे. आम्ही हा मुद्दा सोडणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केलीच पाहिजे. शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आहे असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.