लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे यांच्यावरून राज्यभर प्रचंड गदारोळ सुरू असताना त्यांच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या विषयावर कोणतीही स्पष्ट भूमिका घ्यायला का तयार नाहीत? असा सवाल भाजपमधून उपस्थित केला जात आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, ‘मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहेत. मात्र, कोणीही कसलेही आरोप केले, तरी लगेच संबंधिताला दोषी म्हणता येणार नाही. आरोप करणाऱ्यांनी पुरावे समोर आणावेत. पक्षीय राजकारण न आणता कोणी कितीही मोठा असला तरी कारवाई केली जाईल,’ असे विधान केले आहे. त्याबाबत भाजपचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यात आरोप झाले. तेव्हा त्यांनी तडकाफडकी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. चौकशी पूर्ण झाल्यानंतरच मी मंत्रिमंडळात सहभागी होईल, अशी भूमिका घेतली. धरणातील कमी पाणीसाठ्याबद्दल त्यांच्याकडून विपरीत विधान झाले, तेव्हा त्यांनी प्रीतिसंगमावर जाऊन आत्मक्लेश केला. तो बाणेदारपणा आता कुठे गेला? असा सवाल उपस्थित करून भाजपचे नेते म्हणाले, मुख्यमंत्री जरी आमच्या पक्षाचे असले तरी हे महायुतीचे सरकार आहे. सहयोगी पक्षातील मंत्र्यांविषयी जर आरोप होत असतील तर त्याविषयी कठोर भूमिका आधी त्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी घेतली पाहिजे.
पुण्यात मुंडे यांची शंभर कोटींची मालमत्ता असल्याचा आरोप झाला. वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या पत्नीची एका कंपनीत भागीदारी असल्याचे समोर आले. कृषिमंत्री असताना त्यांच्या काळात सरकारी जमिनीवर विमा काढल्याचे प्रकरणही समोर आले. या सर्व प्रकरणावर धनंजय मुंडे काहीही बोलत नाहीत. अजित पवार या आरोपांवर कसलेही स्पष्टीकरण देत नाहीत. उलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच सुरेश धस यांना पाठीशी घालत असल्याचा आक्षेप राष्ट्रवादीचे नेते घेतात. यामुळे धस यांनी केलेले गंभीर आरोप खोटे कसे ठरतील? असा सवालही भाजपच्या नेत्यांनी केला आहे.
...तर मंत्रिमंडळातून बडतर्फ करा
अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा. जर चौकशीत ते निर्दोष असल्याचे सिद्ध झाले तर त्यांना सन्मानाने मंत्रिमंडळात घ्यावे. हा बाणेदारपणा अजित पवार यांनी दाखवला नाही तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगावे किंवा त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, असा सूर आता भाजपच्या अनेक नेत्यांमधून येत आहे.
एवढी जवळीक कशासाठी?
धनंजय मुंडे यांचा राजीनामा दादांनी घेतला पाहिजे असे अनेक नेते खासगीत सांगतात. मात्र, मुंडे यांच्याविषयी अजित पवार यांची एवढी जवळीक कशासाठी? याचे कोडे आम्हालाही उलगडत नाही, असे राष्ट्रवादीचेच नेते बोलून दाखवत आहेत.
विधानसभा निवडणुकीत परळीत २०१ बूथवर हल्ले; धनंजय मुंडेंकडे आव्हाडांचे बोट
लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात २०१ बूथवर हल्ले झाले, तर १०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले, असा दावा शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. मतदारांच्या बोटाला शाई लावायची आणि त्यांना मतदान न करता बाहेर पाठवायचे. मतदान केंद्रात एक गँग बटण दाबण्याचे काम करायची, असा आरोप करत आव्हाड यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवले आहे.
आव्हाड म्हणाले की, परळीमध्ये बूथ कॅप्चर करताना गोट्या गितेचा व्हिडीओ आम्ही निवडणूक आयोगाकडे दिला आहे. आयोगाने याची गांभीर्याने नोंद घ्यावी, संबंधित अधिकाऱ्यांचे लेखी जबाब जनतेसमोर घ्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.