"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2024 08:31 PM2024-11-30T20:31:36+5:302024-11-30T20:31:36+5:30
"ईव्हीएमसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्याला कुणाला हे ईव्हीएम हॅक करता येत असेल त्याने ते करून दाखवावे."
राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पूर्ण एक आठवडा झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला प्रचंड मोठा विजय मिळाला आहे, तर महाविकास आघाडीचा दारून पराभव झाला आहे. यानंतर महाविकास आघाडीतील उमेदवार आणि नेत्यांसह अनेक जण पराभवाचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडताना दिसत आहे. यातच, " ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येते, मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मला सगळे माहिती आहे," असा दावा राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केला आहे. यावर आता भरतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी त्यांना खुले आव्हान दिले आहे. दानवे पत्रकारांसोबत बोलत होते.
दानवे म्हणाले, "ईव्हीएमसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्टपणे सांगितले आहे की, ज्याला कुणाला हे ईव्हीएम हॅक करता येत असेल त्याने ते करून दाखवावे. पण या पेक्षाही, ज्या मंडळींना, ज्या आमदाराला, ज्या नेतृत्वाला, ईव्हीएमसंदर्भात आक्षेप आहे, त्यांनी ईव्हीएमचे एक डेमोस्टेशन ठेवायला हवे एखाद्या हॉलमध्ये आणि ज्यांना कुणाला वाटते की, आम्ही हे हॅक करू शकतो, त्यांनी ते पब्लिकली हॅक करायला हवे."
नेमकं काय म्हणाले होते महादेव जानकर? -
"अनेक ठिकाणी ईव्हीएम घोटाळा झाल्यामुळे महायुतीच्या जागा निवडून आल्या. ईव्हीएमवर माझा आक्षेप आहे. देशभरात आम्ही याविरोधात आंदोलन करु. ईव्हीएममुळे देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. ईव्हीएम हॅक करता येते, मी स्वतः इंजिनिअर आहे. त्यामुळे मला सगळे माहिती आहे. सुप्रीम कोर्ट, निवडणूक आयोग सगळे त्यांचेच आहेत. त्यामुळे याला लोकशाही म्हणता येणार नाही," असे जानकर यांनी म्हटले होते.