एसएमएस मोहिमेचा बोलाविता धनी कोण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2015 00:50 IST2015-07-20T00:50:22+5:302015-07-20T00:50:22+5:30
गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजपा नेते संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी आता ‘एसएमएस’ मोहीम सुरू झाली आहे

एसएमएस मोहिमेचा बोलाविता धनी कोण ?
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून राजकीय विजनवासात असलेल्या भाजपा नेते संजय जोशी यांच्या घरवापसीसाठी आता ‘एसएमएस’ मोहीम सुरू झाली आहे. परंतु त्याबाबत पूर्णत: अनभिज्ञ असल्याचे जोशी यांनी ‘लोकमत’ला सांगितले. त्यामुळे ‘एसएमएस’ मोहिमेचा बोलविता धनी कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
देशभरात चाललेल्या ‘पोस्टरबाजी’नंतर आता ‘संजय जोशी फॅन्स क्लब’च्या नावाने जोशी यांची घरवापसी व्हावी, अशा आशयाचे ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणावर चर्चा सुरू झाली आहे.
संजय जोशी यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारे ‘एसएमएस’ फिरत असल्याची मला काहीही माहिती नाही. परंतु ही नक्कीच गंभीर बाब आहे. त्याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘पोस्टरबाजी’नंतर जोशी यांनी, मी कार्यकर्ता आहे व कार्यकर्ता राहणेच मला पसंत आहे. पक्षनेतृत्वावर माझा विश्वास असून पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे नेते आहेत, असे स्पष्ट केले होते. परंतु आता ‘एसएमएस’ मोहिमेनंतर जोशी यांच्या घरवापसीसाठी भाजपात नेमके कोण उत्सुक आहेत, असा प्रश्न निर्माण झाला असून चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)