एसीबीची धुरा कोणाकडे?
By Admin | Updated: August 1, 2016 04:41 IST2016-08-01T04:41:29+5:302016-08-01T04:41:29+5:30
पदभार स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होणार, याकडे पोलीस वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून राहिले

एसीबीची धुरा कोणाकडे?
जमीर काझी,
मुंबई- राज्याचे पोलीसप्रमुख म्हणून ज्येष्ठ आयपीएस अधिकारी सतीश माथुर यांनी रविवारी पदभार स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एससीबी) महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती होणार, याकडे पोलीस वर्तुळासह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. माथुर यांच्यानंतर ज्येष्ठ अधिकारी असलेले राकेश मारिया यांची त्या पदावर नियुक्ती होणे अपेक्षित असले तरी त्यांच्याबाबतच्या राज्य सरकारच्या ‘वक्र’ दृष्टीमुळे त्याबाबत अनिश्चितता कायम आहे. मात्र त्यांना डावलून अन्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे किंवा या पदावर अधिक काळ पूर्णवेळ अधिकारी न नेमणे राज्य सरकारला महागात पडण्याची चिन्हे आहेत.
पोलीस गृहनिर्माण व कल्याण निधीचे सरव्यवस्थापक के.एल. बिष्णोई तीन महिन्यांनी सेवानिवृत्त होणार असून, दीक्षित रिटायर झाल्याने रिक्त झालेल्या डीजीच्या एका पदासाठी ते पात्र ठरलेले आहेत. मात्र मारिया यांना डावलण्यासाठी ते पद रिक्त ठेवल्यास बिष्णोई न्यायालयात जाऊ शकतात, तर मारिया यांच्याऐवजी विधि व तांत्रिक विभागाचे प्रमुख प्रभात रंजन यांची ‘एसीबी’पदी नियुक्ती केल्यास मारिया या निवडीला आव्हान देऊ शकतात, कारण राज्य सरकारने यापूर्वी उच्च न्यायालयात एका खटल्यात पोलीस महासंचालकानंतर एसीबीचे प्रमुखपद हे राज्यातील द्वितीय दर्जाचे पद असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे नमूद केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एसीबी’च्या प्रभारीबाबत निर्णय घेताना सर्व बाबी विचारात घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या नेतेमंडळीच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणांची चौकशी ‘एसीबी’ करीत असताना या पक्षाच्या जवळचे असल्याच्या शिक्क्यामुळे मारिया यांची त्या पदावर नियुक्ती करणे भाग पडणार असल्याचे गृह खात्यातील वरिष्ठ अधिकारी व जाणकाराकडून सांगण्यात येत आहे.
सध्या या पदाचा तात्पुरता पदभार विभागाचे अपर महासंचालक विवेक फणसाळकर यांच्याकडे आहे. २८ फेबु्रवारीला तत्कालीन प्रमुख विजय कांबळे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर जवळपास दोन महिने ‘एसीबी’ला पूर्णवेळ अधिकारी नव्हता. २५ एप्रिलला सतीश माथुर यांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली होती. या वेळी दोन महिने हे पद रिक्त ठेवणे सरकारला शक्य नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे.
>मारियांचा आग्रही पवित्रा
गेल्या वर्षी ७ सप्टेंबर मुंबईचे तत्कालीन आयुक्त राकेश मारिया यांची तडकाफडकी पदोन्नतीवर उचलबांगडी करण्यात आली होती. त्यामागे बहुचर्चित शीना बोरा खून प्रकरणाच्या तपासाचा संदर्भ होता. तेव्हापासून मारिया ‘होमगार्ड’चे महासमादेशक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्यानंतर अनेक वर्षांनी कनिष्ठ असलेल्या अधिकाऱ्यांना पोलीस गृहनिर्माण तसेच विधि व तांत्रिक विभागाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले आहे. आता मात्र एसीबी हे अत्यंत प्रतिष्ठेचे पद असल्याने तसेच सेवानिवृत्तीसाठी जेमतेम सहा महिन्यांचा कालावधी राहिल्याने मारियाही त्यासाठी आग्रही राहण्याच्या पवित्र्यात असल्याचे सांगितले जाते.