हजारे-लांजेवारचे गॉडफादर कोण?
By Admin | Updated: August 1, 2014 01:17 IST2014-08-01T01:17:42+5:302014-08-01T01:17:42+5:30
पारडी भागात दोन वेगवेगळ्या पक्षांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले दोन गावनेते एकमेकांचा सूड घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. त्यांच्या गुंडगिरीने

हजारे-लांजेवारचे गॉडफादर कोण?
जनतेचा सवाल
नागपूर : पारडी भागात दोन वेगवेगळ्या पक्षांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले दोन गावनेते एकमेकांचा सूड घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून गुंडगिरी करून सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत. त्यांच्या गुंडगिरीने प्रचंड दहशत पसरून लोकांना जगणे मुश्कील झाले आहे. या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचा गॉड फादर कोण आहे, त्यांना राजकीय पक्ष पोसतातच कशाला, असा सामान्य जनतेचा सवाल आहे.
जगदीश वासुदेव लांजेवार आणि पुरूषोत्तम नागोराव हजारे या दोघांनी ही दहशत पसरवली आहे. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या लांजेवार आणि हजारेने आपापल्या गुंडांच्या मदतीने कळमन्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी सशस्त्र हाणामाऱ्या तसेच हल्ले प्रतिहल्ले सुरू ठेवले आहेत. बुधवारी रात्री हजारे आणि त्याच्या गुंडांनी अशाच प्रकारे लांजेवारवर गोळीबार करून प्रचंड दहशत निर्माण केली. सुदैवाने लांजेवार बचावला. त्याहीपेक्षा सुदैव म्हणजे, या गोळीबारातून एक गर्भवती महिला सुखरूप बचावली. नशीब बलवत्तर म्हणून तिच्या बाजूने गोळी गेली. त्यानंतर लांजेवार गटाने हैदोस सुरू केला. पोलिसांच्या नावानेही शिमगा केला.
बुधवारची घटना पारडीवासीयांसाठी आणि पोलिसांसाठीही नवीन नाही. एकमेकांवर हल्ले करणे आणि कारवाईसाठी पोलिसांवर दडपण आणणे असा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. कधी हजारेच्या गटातील मंडळी तर कधी लांजेवारच्या गटातील मंडळी तक्रारी नोंदवतात. त्यावर कारवाई व्हावी म्हणून या पक्षाचे जबाबदार नेतेही पोलीस ठाण्यात पोहचतात. एकाकडून कारवाई व्हावी यासाठी दबाव आणला जातो. तर, दुसऱ्याकडून कारवाई होऊ नये यासाठी दबाव आणला जातो.
नेते वजनदार असल्यामुळे या गुंडांनी कळमना, लकडगंज पोलिसांना चक्क फुटबॉल करून ठेवले आहे. मनात येईल तेव्हा ते किक मारण्याचा प्रयत्न करतात. पक्षात गुन्हेगारी खपवून घेणार नाही, अशी भाषा वापरणारे नेते पक्षातील या कुख्यात गुन्हेगारांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत की, काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
गुंडांना राजकीय पक्ष पोसतात कशाला ?
निवडणूक ‘मनी’ आणि ‘मसल’ पॉवरनेच जिंकता येते, असा दृढ समज असल्याने सारेच राजकीय पक्ष गुन्हेगारांची मदत घेऊन त्यांचे पालनपोषण करीत आहेत. राजकीय पाठबळामुळे खुद्द गुन्हेगार निवडणूक आखाड्यात उतरत आहेत. एकेकाळी नेत्यांसोबत फिरून दादागिरीच्या भरवशावर निवडणूक जिंकून देणारा हा गुन्हेगार खुद्द निवडणूक लढून जिंकत आहे.
राजकीय आश्रय मिळालेला हा गुन्हेगार समाजात सामाजिक कार्यकर्ता नव्हे ‘वाल्याचा वाल्मिकी म्हणून’ वावरत असला तरी त्याला संपत्तीचा मोह आवरत नाही. आधीची गुन्हेगारी प्रवृत्तीही त्याला याच मार्गाने घेऊन जाते. तो जमिनी बळकावतो, मालमत्ता हडप करून देण्यासाठी सुपारी घेतो, अपहरण करतो, व्यापारी व बड्या व्यावसायिकांकडून खंडणी वसूल करतो, बडे जुगार अड्डेही चालवितो.
‘त्या’ दोन बंधूंचा महिमा
प्रस्तुत प्रतिनिधीने राजकीय आश्रय घेतलेल्या आणि राजकीय आश्रय दिलेल्या शहरातील काही गुन्हेगारांबाबत गोळा केलेली माहिती अशी, पूर्व नागपुरातील हे दोन बंधू, त्यापैकी एक भाजपचा विद्यमान नगरसेवक तर दुसरा जुगार अड्डे चालविणारा आहे. कोट्यवधीची जमीन बळकावल्याप्रकरणी त्यांना काही दिवस कारागृहात राहावे लागले. त्यांच्याविरुद्ध मोक्काची कारवाईही झालेली आहे. विशेष न्यायालयातून शिक्षा होऊन ते उच्च न्यायालयातून निर्दोष सुटले आहेत. त्यांच्याविरुद्ध आणखी एक मोक्काचा खटला प्रलंबित आहे. शहरालगतच्या सर्वाधिक जमिनी आज या बंधूंच्या नावाने आहे. पूर्वी सट्टा व जुगार अड्डे चालविण्यासाठी ते राजकीय नेत्यांचा आश्रय घेत होते. आता राजकीय नेते त्यांचा आश्रय घेत आहेत. मोहल्ल्यावर त्यांची इतकी जबरदस्त पकड आहे की ते निवडणूक हरूच शकत नाही.
पश्चिम नागपुरातील भूखंड माफिये
पश्चिम नागपुरातही असेच ‘बंधू’ आहेत. गायी-म्हशी पाळणे हा त्यांचा मूळ व्यवसाय. पुढे त्यांनी दादागिरीच्या भरवशावर रिकाम्या जमिनी बळकावल्या. अर्ध्याधिक जमिनीचा वाटा स्वत:कडे ठेवून उर्वरित जमिनीवर त्यांनी वस्त्या वसवल्या. यासाठी ते राजकीय आश्रय घेत होते. आता राजकीय पक्षांना त्यांचाच आश्रय घ्यावा लागत आहे. आज ते भूखंड माफिये आहेत. मोहल्ल्यांवर त्यांची पकड आहे. त्यामुळे निवडणुकीत ते हमखास निवडून येतात. काही काळ त्यांनी भाजपसाठीही काम केले. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.
भाईवर प्रेम कशासाठी?
मध्य नागपुरातील भाजपसाठी काम करणारा हा ‘भाई’ नुकताच एका बिल्डरकडून लाखोची खंडणी वसूल करण्याच्या आरोपात तब्बल पाच महिने कारागृहात राहून जामिनावर बाहेर आला. या भाईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाजपचाच एक विद्यमान आमदार कारागृहात गेला होता. या भाईने एका ज्वेलर्सचा खून केला. साक्षीदारांची फितुरी आणि सबळ पुराव्याअभावी तो निर्दोष झाला. एका भूखंड व्यावसायिकाच्या खुनाचा त्याच्यावर संशय आहे. तो बड्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या रकमेची खंडणी ‘हवाला’द्वारे वसूल करतो. मुंबई स्टाईलची त्याची गुन्हेगारी आहे. तीनवेळा त्याच्यावर ‘मोक्का’ची कारवाई झाली आहे. दोन प्रकरणातून तो निर्दोष झाला आहे. एक प्रकरण अद्यापही सुरू आहे. भूखंड हडपणे आणि खंडणी वसुली करणे हा त्याचा व्यवसाय झाला आहे. काही काळ त्याने उत्तर नागपूरच्या एका नेत्याचा आश्रयही घेतला होता.
दक्षिण नागपुरातही भाई
दक्षिण नागपुरातील हा ‘भाई’ गेल्या चार-पाच वर्षांपासून काँग्रेसच्या खेम्यात काम करतो आहे. एका खुनात त्याला जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे. तो सध्या जामिनावर आहे. त्याच्याविरुद्ध खंडणी वसुली आणि भूखंड बळकावण्याचे आरोप आहेत. गत मनपा निवडणुकीत त्याने आपली फौज लढवली होती. त्यापैकी दोन जण निवडूनही आले.
महाल भागात तीन-चार खुनाचा आरोप शिरावर असलेला आणि प्रचंड दहशत माजवणारा हा एक गुन्हेगार आपली पहिलीच मनपा निवडणूक लढून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचंड मताने निवडून आला होता. यंदाच्या निवडणुकीत मात्र तो पराभूत झाला. आता तो भाजपचे काम करतो आहे. अजनी भागातील दोन भाऊ परस्परविरोधात राजकीय कामे करतात. एक भाजपचा नगरसेवक आहे. तर दुसरा काँग्रेसचा कट्टर कार्यकर्ता आहे. इतवारी रेल्वेस्थानक भागात जुगार अड्डा चालविणारा काँग्रेसचा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचेही आरोप आहेत. अजनी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात ‘खून का बदला खून’ , असे काही काळ सत्र चालविणारा एक नामचिन गुन्हेगार गत मनपा निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून निवडून आला होता. तर काँग्रेसचा आश्रय घेतलेल्या एका गुन्हेगाराने स्वत:च्या पत्नीला गत मनपा निवडणुकीत निवडून आणले होते. हा गुन्हेगार संघटित टोळीचा म्होरक्या आहे. छोटा ताजबाग क्षेत्रातील एका गुंडाने यंदाच्या मनपा निवडणुकीत आपल्या पत्नीला निवडून आणले आहे. या गुन्हेगाराविरुद्ध खुनाचे आरोप आहेत. तो बडे जुगार अड्डे चालवितो. सारेच पक्ष गुन्हेगारांचा आश्रय घेतात. कालांतराने हे गुन्हेगार वरचढ ठरतात. गुन्हेगारी प्रवृत्ती कायम राहून गंभीर गुन्हा घडला की, संबंधित पक्षाला गालबोट लागते. त्यामुळे राजकीय पक्ष हे गुन्हेगार पोसतात कशाला असा जनतेचा प्रश्न कायम राहतो. (प्रतिनिधी)