नागपूर : अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक किस्सा सांगत 'जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश काय सांभाळणार', असा अप्रत्यक्ष टोला लगावल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नागपूरमध्ये अभाविपच्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी त्यांनी एका व्यक्तीचा किस्सा सांगितला. '' मला खूप लोकं भेटतात. एक कार्यकर्ता म्हणाला, मला माझ आयुष्य भाजपासाठी द्यायचे आहे. त्याला विचारले काय करतो, तर त्याने दुकान चालत नाही म्हणून बंद केल्याचे सांगितले. त्यावर मी त्याला तुझ्या घरी कोणकोण आहेत असे विचारले. त्याने पत्नी, मुले आहेत असे सांगितले. यावर मी त्याला आधी घर सांभाळ असा सल्ला दिला'', असे गडकरी यांनी सांगितले.
हे वाक्य ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. गडकरी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी यामागचे स्पष्टीकरणही दिले. जो आपले घर सांभाळू शकत नाही, तो देश सांभाळू शकत नाही, असे म्हटले. यावरून गडकरी यांनी नेमका कुणावर निशाना साधला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.