बेपत्ता मुले अखेर जातात तरी कुठे?
By Admin | Updated: July 27, 2014 01:30 IST2014-07-27T01:30:51+5:302014-07-27T01:30:51+5:30
कल्याण(मुंबई)मधील बेपत्ता तरुण इराकमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेल्याचे वृत्त आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे देशभरातील बेपत्ता मुलांचा-तरुणांचा प्रश्न कधी नव्हे तेवढ्या

बेपत्ता मुले अखेर जातात तरी कुठे?
तपास यंत्रणांपुढे प्रश्न : कसून शोध घेण्याचे आदेश
नरेश डोंगरे - नागपूर
कल्याण(मुंबई)मधील बेपत्ता तरुण इराकमध्ये दहशतवादी प्रशिक्षणासाठी गेल्याचे वृत्त आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे देशभरातील बेपत्ता मुलांचा-तरुणांचा प्रश्न कधी नव्हे तेवढ्या गांभीर्याने तपास यंत्रणांमध्ये चर्चेला आला आहे. या पार्श्वभूमीवर, ‘बेपत्ता मुले गेलेत तरी कुठे, त्यांचा कसून शोध घ्या. तुमच्या भागातील किशोरवयीन मुलांची डोकी भडकविण्याचे कारस्थान सुरू आहे काय, त्याचीही गांभीर्याने तपासणी करा, असे आदेश वरिष्ठ पातळीवरून तपास यंत्रणांना मिळाले आहेत.
विविध शहरातून खासकरून महानगरातून किशोरवयीन मुले, तरुण बेपत्ता होण्याचे प्रमाण अचानक वाढले आहे. एकट्या नागपुरातून २०११-१२ मध्ये १६८६ जण बेपत्ता झाले. त्यात ६३८ मुलांचा आणि तरुणांचा समावेश होता. २०१३ मध्ये १०५४ जण बेपत्ता झाले तर, जानेवारी ते जून २०१४ या सहा महिन्यात ५४० जण बेपत्ता झाले आहेत. यापैकी १५० जण १५ ते २८ वयोगटातील (किशोरवयीन मुले आणि तरुण) असल्याचे सांगितले जाते. बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले असताना ते परत येण्याचे (सापडण्याचे) प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे बेपत्ता मुले-तरुण जातात तरी कुठे, असा प्रश्न आतापर्यंत सर्वसामान्यांना सतावत होता.
कल्याणमधून बेपत्ता झालेले चार तरुण आयसीस (आयएसआयएस) या इराकमधील दहशतवादी संघटनेत (प्रशिक्षणासाठी) गेल्याची धक्कादायक माहिती उघड झाल्याने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली. अन् ‘बेपत्ता मुले अखेर जातात तरी कुठे’, असा प्रश्न तपास यंत्रणांचीही डोकेदुखी वाढवणारा ठरला. त्यामुळे आता प्रत्येकच ठिकाणच्या किशोरवयीन बालके आणि तरुणांच्या बेपत्ता होण्यामागची पार्श्वभूमी जाणून घेण्याची गरज तपास यंत्रणांना वाटत आहे. परिणामी बेपत्ता होण्यापूर्वी ‘तो’ कुणाच्या संपर्कात होता, बेपत्ता झाल्यानंतर त्याचा ठावठिकाणा लागला काय, त्याचे सध्याचे वास्तव्य कुठे आहे, मुलांची डोकी भडकविण्याचे कारस्थान तर सुरू नाही ना, त्याचाही शोध घेण्याच्या सूचना दहशतवाद विरोधी पथकासह सर्वच ठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.