देश कुठे चालला आहे ?

By Admin | Updated: August 18, 2014 00:33 IST2014-08-18T00:33:13+5:302014-08-18T00:33:13+5:30

खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा,

Where is the country going? | देश कुठे चालला आहे ?

देश कुठे चालला आहे ?

अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा : ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा सवाल
नागपूर : खासगीकरणाच्या नावावर देशाला विकण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्वच सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करण्यात आले असून यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे फिक्सींग आहे. देशातील राजकीय पक्ष हे टाटा, बिर्ला आणि अंबानीसारख्या उद्योगपतींच्या इशाऱ्यावर चालत असून देश नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा गुलाम बनला आहे. सध्याची परिस्थिती बघता देश कुठे चालला आहे, असा सवाल मत शिवराज्य पक्षाचे अध्यक्ष ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी येथे व्यक्त केले.
समता सैनिक दलातर्फे शनिवारी हिंदी मोरभवन येथे ‘भारत सरकारच्या अर्थसंकल्पाची आंबेडकरी मीमांसा’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक अ‍ॅड. विमलसूर्य चिमणकर होते तर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय निमंत्रक अशोक बोंदाडे आणि राष्ट्रीय प्रचारक प्रकाश दार्शनिक प्रमुख वक्ते होते.
ब्रिगेडियर सावंत यांनी आपल्या भाषणात भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चांगलेच धारेवर धरले. या देशातील समतावादी संस्कृती नष्ट करण्यासाठी विषमतावादी अर्थव्यवस्था रुजविण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दुतोंडी आहे. खासगीकरणाच्या माध्यमातूनच या देशाचा विकास होऊ शकतो, अशी नवी समज देशात रुजविण्याचे कारस्थान सुरू आहे. संरक्षण व विमा क्षेत्रातील एफडीआय (प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक) ही ४९ टक्क्यावर नेऊन या देशातील डिफेन्सच्या जमिनी विक्रीला निघाल्या आहेत. इस्रायल व अमेरिकन कंपन्यांशी संगनमत करून हे सर्व केले जात आहे. काँग्रेस आणि भाजपा हे एकमेकांना कितीही शिवीगाळ करीत असले तरी ते याबाबत जुळी भावंडे आहेत. दोघांचाही उद्देश एकच आहे. उद्योगाला चालना देण्याच्या गोंडस नावाखाली सामान्य बहुजनांना संरक्षण देणारे कायदे रद्द केले जात आहेत.
जोपर्यंत या देशातील शेतकऱ्यांच्या हातात पैसा येणार नाही तोपर्यंत देश विकास करू शकणार नाही. सामान्य माणूस सशक्त झाला नाही तर देश सक्षम कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. प्रकाश दार्शनिक यांनीही अर्थसंकल्पातील सामान्यजनांवरील अन्यायावर प्रकाश टाकला. अशोक बोंदाडे यांनी प्रस्ताविक केले. डी.पी. रुपनारायण यांनी संचालन केले. सुनील सारिपुत्र यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. विमलकिर्ती, ई.मो. नारनवरे, घनश्याम फुसे, शंकर मानके, डी.बी. वानकर, केतन पिंपळापुरे, एकनाथ ताकसांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Where is the country going?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.