जागेचे हस्तांतरण होणार कधी?
By Admin | Updated: December 21, 2014 00:20 IST2014-12-21T00:20:20+5:302014-12-21T00:20:20+5:30
उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला

जागेचे हस्तांतरण होणार कधी?
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : शासकीय अनास्थेचा फटका
योगेश पांडे -नागपूर
उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला असून ही रक्कम २५ डिसेंबर पर्यंत भरण्यासंदर्भात शासनाला कळविले आहे. परंतु अद्याप या निधीसंदर्भात अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाच्या या कासवगतीमुळे महाविद्यालय पुढील शैक्षणिक सत्रात तरी सुरू होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर येथील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बाहेर झाले. त्यानंतर उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे ही मागणी जोर धरायला लागली होती. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायलाच बरीच प्रतीक्षा करावी लागली. ३ जून २०१४ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कामठी रोड येथील ‘आॅटोमोटिव्ह’ चौकाजवळील मौजा वांजरी परिसरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत ही जागादेखील तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळालेली नाही. ‘एनआयटी’च्या अखत्यारितील या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
२०१४-१५ या शैक्षणिक वर्षातच भाड्याच्या इमारतीत तरी अभ्यासक्रम सुरू होतील, असे आश्वासन तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले होते. परंतु अद्याप जागाच हाती न आल्यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रिय अडकलेली आहे. जागा मिळाल्यानंतर ‘एआयसीटीई’ला महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जागा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ताब्यात येणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
या जागेचा दर २६ कोटी ६१ लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. या निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या संथगतीमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जागा जरी ताब्यात आली, तरी ‘एआयसीटीई’ची मंजुरी मिळेपर्यंत पुढील शैक्षणिक सत्र सुरू होऊन जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित मुद्यावर शासनाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी बोलणे योग्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.