‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ कधी होणार ?
By Admin | Updated: November 28, 2014 01:05 IST2014-11-28T01:05:33+5:302014-11-28T01:05:33+5:30
देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक दुसरा लागतो. स्वरयंत्र आणि तोंडाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे सहा हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची

‘कॅन्सर इन्स्टिट्यूट’ कधी होणार ?
मेडिकलला आजही प्रतीक्षा : राज्यासह केंद्राला पाठविले पाचवेळा प्रस्ताव
सुमेध वाघमारे - नागपूर
देशात स्तनाच्या कॅन्सरमध्ये नागपूरचा क्रमांक दुसरा लागतो. स्वरयंत्र आणि तोंडाच्या कॅन्सरमध्ये देशात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. यातच उपराजधानीत दरवर्षी सुमारे सहा हजारांवर नव्या कॅन्सरग्रस्तांची नोंद होते. मात्र मुंबई,औरंगाबाद व पुणे शहराच्या तुलनेत नागपुरातील यंत्रसामग्री, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची उपलब्धा तोकडी आहे. येथील मेडिकलच्या कर्करोग विभागाचा भार आजही कालबाह्य कोबाल्ट युनिटवरच आहे. याला घेऊन स्वत: कॅन्सर रुग्णांनी आंदोलन केले. मेडिकलच्या कर्करोग विभागानेही तब्बल पाचवेळा स्वतंत्र कॅन्सर इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव राज्यासह केंद्राला पाठविला, परंतु दरवेळी तोंडाला पाने पुसण्यात आली. शासनाच्या उदासीनवृत्तीमुळे कॅन्सर रुग्ण अडचणीत सापडला आहे.
उपराजधानीत मेडिकलमध्येच नाही तर खासगी इस्पितळांमध्येही कॅन्सर रु ग्णांची संख्या वाढत आहे. यातील साधारण ६० टक्के रुग्ण मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. परंतु येथील कर्करोग विभाग मरणासन्न अवस्थेत आहे. २००६ मध्ये लावलेले कोबाल्ट युनिट कालबाह्य झाले आहे. असे असतानाही या यंत्रावर दोन हजार रुग्णांचा उपचार केला जात आहे. जुने तंत्रज्ञान आणि दोनच तंत्रज्ञ असल्याने फक्त ७० ते ८० रुग्णांनाच रोज रेडिओथेरपी देणे शक्य होत आहे. यामुळे रुग्णांची प्रतीक्षा यादी लांबली आहे. नव्या रुग्णाला महिनाभरानंतरची तारीख दिली जात आहे. यालाच घेऊन त्रस्त कॅन्सर रुग्णांनी २०१२ च्या हिवाळी अधिवेशनात आंदोलन केले.