जेव्हा कुंचला कुलदीपला शरण जाता
By Admin | Updated: November 24, 2014 23:06 IST2014-11-24T22:26:01+5:302014-11-24T23:06:06+5:30
घरातून वारसा : २८0 तासांत साकारले राज्याभिषेकाचे चित्रे

जेव्हा कुंचला कुलदीपला शरण जाता
इस्लामपूर : शिक्षण जेमतेम दहावीपर्यंत. कलेच्या प्रांतातील पदवी, औपचारिक शिक्षण नाही. घरातील चित्रकलेचा वारसा मिळाला, हीच त्याची शिदोरी. वाळव्याचा कुलदीप पोतदार हे सहजपणे सांगतो आणि निमंत्रितांना आपल्या अभिजात कलेची अदाकारी दाखवतो, तेव्हा त्याची चित्रे पाहताना कुंचलाच जणू कुलदीपला शरण गेल्याची भावना नकळत मनात उमटते.
साधारणपणे १९८८ च्या सुमारास कुलदीपने आपल्या हाती कुंचला धरला आणि तो बघता-बघता वाळव्यापासून दिल्लीपर्यंत पोहोचला. कुंचला हेच त्याचे भावविश्व आणि जीवन बनून गेले आहे. माझे चित्र पाहणाऱ्या व्यक्तीला समाधान मिळणार, हा कुलदीपचा ठाम विश्वास. हाती कुंचला आला नाही, असा दिवस गेला, तर मन सैरभर होते, असे सांगणारा हा चित्रकार तेवढ्याच ताकदीचा छायाचित्रकारही आहे.कुलदीपच्या कुंचल्यातून २८ दिवस व २८0 तासांच्या परिश्रमातून साकारलेली शिवराज्याभिषेकाची प्रतिमा डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली आहे. राज्याभिषेकाच्या मूळ चित्रापेक्षा आकर्षक प्रतिमा बनवताना त्यातील मूळ संकल्पना आणि तत्त्वांना धक्का बसणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेत कुलदीपने आपला रंगांचा आविष्कार दाखवला आहे. इंग्लंडमध्ये निर्मिती झालेले विन्सल न्यूट्रॉनचे रंग वापरुन कॅनव्हासवर शिवराज्याभिषेक सोहळा जिवंत करण्याची ताकद कुलदीपच्या कुंचल्यात आहे.
प्रतिमेत कुठेही दिवा नाही. मात्र सगळा शामीयाना विविध रंगांच्या दीपोत्सवाने उजळून टाकण्याची कुलदीपची किमया थक्क करुन सोडणारी आहे. प्रतिमेतील मोठ्या ११0 व्यक्तिरेखा, त्यांचे पेहराव, महिलांचा साजशृंगार, ब्रिटिश अधिकाऱ्याचा कुर्निसात आणि ताटावर हिरवीगार मखमल टाकून आलेला नजराणा, शिंग, तुतारी वाजवणारे मावळे... असे किती तरी बारकावे टिपण्याची कुलदीपची प्रगल्भता, त्याची कलेशी असणारी घट्ट नाळ दाखविणारी आहे.
कुलदीपच्या डोक्यात एखाद्या चित्राची कृती संचारली की, कॅनव्हासवर त्याची निर्मिती सुरु होते. या कृती आणि निर्मितीमधून जी चित्राची संस्कृती जन्माला येते, ती अवीट, अविस्मरणीय आनंदाचा ठेवा घेऊनच. (वार्ताहर)
वाळवा येथील कुलदीप पोतदार याने साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची कलाकृती.