लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असली तरी तो प्रवासी वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी अद्याप महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) मुहूर्त मिळत नसल्याची स्थिती आहे.
उद्घाटन लांबण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यातले एक असे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रत्यक्ष व ऑनलाइन या टप्प्याचे उद्घाटन व्हावे, असे ठरविण्यात आले. मात्र, अद्याप पंतप्रधानांची तारीख मिळालेली नाही. १ मे रोजी पंतप्रधान मोदी मुंबईत अन्य एका समारंभासाठी मुंबईत होते. मात्र त्यावेळी ते शक्य होऊ शकले नाही. काश्मीरमधील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर सुरक्षेचा भाग म्हणून हे उद्घाटन टाळले जात असल्याचीदेखील चर्चा आहे.
उद्घाटन नेमके कधी होणार, याबाबत अधिकृतपणे सांगण्यास एमएसआरडीसीही तयार नाही. आमच्या नावाने देऊ नका, असे म्हणत या अधिकाऱ्यांनी सातत्याने वेगवेगळ्या तारखा दिल्या आहेत. त्यात १ मेची तारीखही होती. अधिकारी असेही सांगतात की उद्घाटनाची तारीख द्या, अशी विनंती आम्ही सरकारला केली आहे, त्यांनी अजून तारीख दिलेली नाही.
काम अपूर्ण असल्याने हे उद्घाटन लांबणीवर यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी इगतपुरी ते आमने हा शेवटच्या टप्प्यातील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाणार होता. मात्र, या टप्प्यात अभियांत्रिकीच्या दृष्टीने किचकट असलेल्या खर्डी येथील एका १.५ किमी लांबीच्या पुलाचे काम बाकी होते.त्याचबरोबर समृद्धी महामार्गाचा शेवट होतो त्या आमने येथून पुढे वडपे येथे जाण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या रस्त्याचे काम अपूर्ण होते. त्यामुळे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये मार्ग वाहतुकीस खुला केला नाही. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत हा रस्ता सुरू करण्याचे नियोजन एमएसआरडीसीने केले होते. मात्र फेब्रुवारीचा मुहूर्तही साधता आला नाही. वडपेजवळ सध्या मुंबई-नाशिक रस्त्याला जोडण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या कनेक्टरचे काम अपूर्ण असल्याने हे उद्घाटन लांबणीवर पडले. सद्य:स्थितीत या कनेक्टरचे एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे. तर एका बाजूकडील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे एका बाजूने वाहतूक वळविली जाणार आहे. त्यादृष्टीने एमएसआरडीसीने नियोजन केले आहे.