सोयाबीनचे करायचे काय? बारदान्याअभावी ३० टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार
By सुनील चरपे | Updated: January 12, 2025 10:03 IST2025-01-12T10:01:51+5:302025-01-12T10:03:22+5:30
केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली.

सोयाबीनचे करायचे काय? बारदान्याअभावी ३० टक्केच खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण, आज मुदत संपणार
नागपूर : राज्य सरकारने नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने राज्यात ५६२ साेयाबीन खरेदी केंद्र सुरू केले. या दाेन्ही संस्थांना १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले. या संस्थांनी तीन महिन्यांत केवळ ३० टक्केच उद्दिष्ट पूर्ण केले. १२ जानेवारीला या खरेदीची मुदत संपणार असून, आठवडाभरापासून बारदान्याअभावी बहुतांश केंद्रांवरील साेयाबीन खरेदी बंद आहे.
केंद्र सरकारने चालू हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली. खरेदी हंगाम सुरू हाेताच खुल्या बाजारात साेयाबीनचे दर प्रतिक्विंटल २,९०० रुपयांपर्यंत खाली आले हाेते. त्यानंतर हेच दर ३,७०० ते ४,००० रुपयांच्या आसपास स्थिरावले. विधानसभा निवडणुकीमुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील १९ जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाफेड व एनसीसीएफच्या मदतीने एमएसपी दरात १४ लाख १३ हजार मेट्रिक टन साेयाबीन खरेदीचा निर्णय घेतला.
बैठक व टेंडरचे वरातीमागून घाेडे
हा तिढा साेडविण्यासाठी पणनमंत्री जयकुमार रावल यांनी बुधवारी (दि. ८) मंत्रालयात विशेष बैठक बाेलावली. बैठकीत त्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना बारदान्याची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यावर चार दिवसांत बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली आणि गुरुवारी (दि. ९) नवीन बारदान्याचे टेंडर मागविले. रविवारी (दि. १२) साेयाबीन खरेदीची मुदत संपणार असल्याने बैठक व टेंडरला अर्थ काय? असा प्रश्न आहे.
जुजबी उपाययाेजना
साेयाबीन भरण्यासाठी ५० किलाे क्षमतेच्या पाेत्यांचा वापर केला जाताे. या पाेत्यांवर नाफेडचा लाेगाे, स्टॅम्प व इतर माहिती प्रिंट केलेली असते. एकूण उद्दिष्टाच्या किमान ७० टक्के साेयाबीन नाफेडला खरेदी करावयाची हाेती. आता शेतकऱ्यांचा राेष कमी करण्यासाठी नाफेडने सुस्थितीत व प्रिंट असलेली जुनी पाेती वापरण्याचा फतवा नाफेडने काढला.