काय म्हणता... कसे राहणार यंदाचे पीकपाणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2023 10:46 AM2023-06-11T10:46:53+5:302023-06-11T10:47:22+5:30

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे.

what do you say how will this year crop be | काय म्हणता... कसे राहणार यंदाचे पीकपाणी?

काय म्हणता... कसे राहणार यंदाचे पीकपाणी?

googlenewsNext

- डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ, शब्दांकन : श्रीकिशन काळे

यंदा कमी पाऊस असल्याने सर्वांच्या डोळ्यांत पाणी येणार आहे. सर्वात जास्त शेतकऱ्यांना फटका बसेल. कारण त्यांचे सर्व अर्थकारण पावसावर अवलंबून असते. महाराष्ट्रात यावर्षी पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. जूनमध्ये तर मोठा खंड पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत आणि चांगला, मोठा पाऊस झाल्यावरच पेरण्या कराव्यात.

महाराष्ट्रात सरासरीच्या ९५ टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर मी देत असतो. वाऱ्याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, जळगाव, राहुरी, कराड, अकोला येथे पावसात मोठा खंड राहणार आहे. दापोली, पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, निफाड, सोलापूर, परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहील. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण साधारण राहणार आहे. कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठा खंड असे यंदाचा पाऊस असणार आहे.

दुष्काळी पट्ट्यात नेहमीपेक्षा अजून कमी पाऊस असेल. साधारणपणे नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर इथे सरासरी एवढा म्हणजे १०० टक्के पाऊस होऊ शकेल. पश्चिम विदर्भ अकोला इथे सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९३ टक्के पाऊस पडेल. कोकणातही सरासरीपेक्षा कमी म्हणजे ९४ टक्के पाऊस होणार आहे. धुळे, जळगाव इथेही ९३ टक्केच पाऊस होईल. एकूणच यंदा पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याने सर्वांना त्याचा त्रास सहन करावा लागेल. 

केवळ पिकांवरच नाही, तर जनावरांवरही परिणाम होणार आहे. पावसामुळे जनावरांना चारा उपलब्ध होत असतो. आताच पाण्याचे दुर्भिक्ष्य झालेले आहे. पाऊस नसल्याने पेरण्याच होऊ शकत नाहीत. पाऊस अपुरा पडणार आहे. कमी पावसाचे हे वर्ष आहे. सर्वांना जपून पाणी वापरणे आवश्यक आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न उभे राहणार आहेत. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.   

शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पूर्वतयारी सुरू करावी. पीकपद्धतीनुसार बियाणे व खतांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. खरीप पिकांसाठी जमीन तयार करून शेतातील काडीकचरा, पिकांचे अवशेष गोळा करून स्वच्छता करायला हवी. तसेच पाऊस कमी असल्याने ठिबक सिंचनावर भर द्यावा. उन्ह खूप असल्याने जनावरांना गोठ्यातच मुबलक पाणी द्यावे. पाऊस कमी झाल्याने पिकांवर परिणाम होतोच. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होतील. पाऊस अजून आलेला नाही. पेरण्या उशिरा होणार आहेत. त्याचा सर्व अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. दुष्काळी भागातील पट्ट्यात याची सर्वाधिक झळ पोचेल.   

शेतकऱ्यांनी काय करावे? 

शेतकऱ्यांनी यंदा कमी पाऊस असल्याने कमी कालावधीत येणारी पिके घ्यावीत. जोपर्यंत चांगला पाऊस होत नाही, तोपर्यंत पेरणी करू नये. कारण एक पाऊस झाला आणि लगेच पेरणी केली, तर पुन्हा दुबार पेरणीचे संकट ओढऊ शकते. म्हणून अगोदरच मोठा, चांगला पाऊस झाल्यानंतर पेरण्या करायला घ्याव्यात.  कमी कालावधीमध्ये मूग, मटकी, चवळी, घेवडा अशी पिके घेतली, तर त्याचा फायदा होईल. खरिपात काही तरी उत्पन्न मिळू शकेल. तसेच रब्बीमध्ये कमी पावसावर येणारी हरबरा, करडई आदी पिके घेणे आवश्यक आहे. खूप पाणी लागणारी पिके घेऊ नयेत. कारण तसा पाऊस पडणार नाही.

यंदा दुष्काळी स्थिती? 

१९७२ मधील दुष्काळ अतिशय भीषण होता. तेव्हा १८ जूननंतर मान्सून आपल्याकडे आला होता. यंदाही तशीच परिस्थिती आहे. म्हणून आतापासून उपाययोजना करणे गरजेचे आहे. जूनमध्ये पावसाचा मोठा खंड पडणार आहे. काही भागात चांगला पाऊस होईल. जिथे ६५ मिलिमीटर पाऊस होईल, तिथे पेरण्या करता येऊ शकतील. तोपर्यंत पेरण्या करू नयेत. १९७२ नंतर २००३, २००५, २००९, २०१२, २०१५, २०१८ मध्ये दुष्काळी स्थिती होती. गेल्या काही वर्षांमध्ये एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. दुष्काळासाठी हा एक भाग आणि दुसरा म्हणजे हवामान बदल. या दोन्ही घटकांमुळे दुष्काळ पडत आहे.  

पावसाचा पॅटर्न बदलतोय... 

कमी पाऊस असल्याने आपले व्यवस्थापन सुधारावे लागणार आहे. दरवर्षीपेक्षा काही वर्षांतील पावसात खूप फरक दिसतोय. कमी कालावधीत अधिक पाऊस पडत आहे. तसेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस काही वर्षात झाला आहे. पण यंदा मात्र कमी होणार आहे. सध्या महाराष्ट्रातील हवेचे दाब बदलत आहेत. हवेचा दाब कमी झाला की, मान्सून आपल्याकडे येईल.     
 

Web Title: what do you say how will this year crop be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.