Maharashtra Breaking News: संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. विरोधी आमदारांबरोबरच सत्ताधारी महायुती आणि स्वपक्षातील आमदारच धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्याकडून धनंजय मुंडेंना लक्ष्य केले जात असून, शनिवारी जरांगेंनी मुंडेंना 'तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल', असा इशारा दिला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
धाराशिवमध्ये संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात बोलताना मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं.
मनोज जरांगे धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
"धनंजय मुंडे त्याच्या गुंडांच्या टोळीच्या माध्यमातून असंच करत राहिला तर पुढच्या काळात आपल्याला सुद्धा सावध राहावं लागणार आहे. सगळं पाप झाकण्यासाठी तो ओबीसींचं पांघरून घेतोय. यात ओबीसींचा काय संबंध?", असा सवाल मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंना दिला.
'सोशल मीडियावर माजल्यासारखं बोलत आहात'
"धनंजय देशमुखला तुम्ही धमकी देता. आम्ही गुंडाला बोलायचं नाही? धनंजय मुंडे कोणत्या दिशेला घेऊन चाललाय? आंदोलनं करायला सांगतो. प्रतिमोर्चे काढायला सांगतो. धनंजय मुंडे तुमच्या घरातील कोणी मेल्यावर किंवा मारून टाकल्यावर आम्ही प्रतिमोर्चे काढायचे का? तुम्ही जाळात हात घालू नका. माजल्यासारखं सोशल मीडियावर बोलत आहात. तुम्ही असाच त्रास देत राहिलात, तर मराठ्यांना उठाव करावा लागेल", असा इशारा मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंना दिला.
इथून पुढं तरी गुंडांना थांबव -मनोज जरांगे
"माझा नाईलाज आहे. मी जातीवाद करत नाही. पण, मराठ्यांना न्याय मागताना, संतोष देशमुखांना न्याय मागताना, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागताना, कोणाला जातीवाद वाटत असेल, तर बिनधास्त जातीवाद वाटू द्या. मी न्याय घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. धनंजय मुंडे, इथून पुढे तरी द्या गुंडांना थांबव. त्या गुंडांचा माज जर तुला थांबवता येत नसेल. ओबीसींचे नेते मराठ्यांच्या अंगावर घालून त्यांना आंदोलन करायला लावणार असशील, तर लक्षात ठेव वेळ प्रत्येकावर येते", असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.