Maharashtra Honey Trap Case: राज्यात गाजत असलेल्या हनी ट्रॅपच्या प्रकरणातील प्रफुल्ल लोढा याचे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो दाखवत भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केला आहे. प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांचे फोटो विरोधकांकडून दाखवल जात आहे. त्याला महाजन यांनी दाखवत उत्तर दिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे हनी ट्र्रॅप प्रकरणात अडकलेल्या प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याचा आरोप होत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह विरोधी पक्षातील काही नेत्यांनी गिरीश महाजनांना या प्रकरणात ओढले आहे.
गिरीश महाजन भडकले, विरोधकांना फोटो दाखवले
विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना गिरीश महाजन यांनी उत्तर दिले. हनी ट्रॅप प्रकरणावर बोलताना महाजन म्हणाले, "हनी ट्रॅप प्रकरणानंतर काहीही संबंध नसताना केवळ एका फोटोच्या जोरावर प्रफुल्ल लोढासोबत माझे नाव जोडण्यात काही रिकामटेकडे लोक पुढे आहेत. त्यांच्याच पक्षाचे नेते असलेल्या शरद पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, जयंत पाटील यांच्यासोबत प्रफुल्ल लोढाचे असंख्य फोटो आहेत. आता या लोकांचे प्रफुल्ल लोढा सोबत काय संबंध आहेत?", असा उलट सवाल महाजनांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केला आहे.
"त्यांचेच सरकार असताना मला नाहक खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. त्यासाठीच सर्वांनी या प्रफुल्ल लोढाला हाताशी धरलं होतं का?", असा गंभीर आरोप आता गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीवर केला आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळेंसोबत प्रफुल्ल लोढाचे फोटो
गिरीश महाजन यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत महाजन यांनी म्हटले आहे, "खुद्द 'मोठे साहेब'शरद पवारांसोबत प्रफुल्ल लोढाची गहन चर्चा... जिथे संजय राऊत उभा राहतो तिथे उद्धव ठाकरे यांच्या अगदी शेजारी उभा असलेला, कोणीही मास्क लावलेला नसताना (ओळख लपवण्यासाठी) एकटाच मास्क लावून असलेला प्रफुल्ल लोढा... सुप्रिया सुळे ताईंसोबत खडसेंचा लाडका लोढा... शरदचंद्र पवार गटाचे गटाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष / कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांच्याशी प्रफुल्ल लोढाची जवळीक..."
गिरीश महाजनांचे एकनाथ खडसेंनाही उत्तर
हनी ट्रॅप प्रकरणात आरोप करणाऱ्या एकनाथ खडसेंनाही महाजनांनी फोटो दाखवत उत्तर दिले आहे.
"एकनाथ खडसे... तुमच्या या "गुलाबी गप्पा" कोणासोबत रंगल्या आहेत? ये रिश्ता क्या कहलाता है? तुमचे हे षडयंत्र जनतेसमोर उघड होतंय… हाच तो प्रफुल्ल लोढा ज्याला तुम्ही दारूडा बोलला होतात? हाच तोच प्रफुल्ल लोढा ज्याने तुमच्यावर स्वतःच्या मुलाच्या खुनाचा आरोप केलेला आहे", असा प्रश्नांचा भडिमार महाजनांनी खडसेंवर केला आहे.
"२०१९ ते २०२२ च्या दरम्यान अशा खोट्या पुराव्यांच्या आधारे सत्तेचा गैरवापर करून तुम्ही माझ्यावर असंख्य आरोप केले. त्या प्रत्येक आरोपाची चौकशी झाली. अगदी आर्थिक गुन्हे शाखेकडूनही माझी चौकशी झाली, पण त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. मी निर्दोष आहे हेच वारंवार सिद्ध झाले. याबद्दल सविस्तर बोलेलच", गिरीश महाजन खडसेंना उत्तर देताना म्हणाले.
"आता तुमच्याच म्हणण्यानुसार जो लोढा दारूडा आहे, त्याच प्रफुल्ल लोढाचा आधार घेऊन माझ्यावर बिनबुडाचे आरोप करताय? एकनाथ खडसे… काय तुझी ही व्यथा", अशी टीका महाजनांनी एकनाथ खडसेंवर केली आहे.
बावनकुळेंनी खडसेंना सुनावले
एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेल्या आरोपांबद्दल महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "एखाद्या व्यक्तीशी संबंध असणे म्हणजे त्याचा अर्थ गुन्हा केला असे होत नाही. माझेही अनेकांसोबत संबंध आहेत; पण त्याचा अर्थ मी काही गैर केले आहे, असा होत नाही. खडसे सतत गिरीश महाजनांवर आरोप करतात, हे योग्य नाही", अशा शब्दात बावनकुळेंनी खडसेंना सुनावले.