उदयनराजेंचे भाजपामध्ये स्वागत करू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2017 04:31 IST2017-01-14T04:31:38+5:302017-01-14T04:31:46+5:30
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय जनता पक्षात मनापासून स्वागत असेल, असे सूतोवाच करतानाच महसूलमंत्री

उदयनराजेंचे भाजपामध्ये स्वागत करू!
सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे भारतीय जनता पक्षात मनापासून स्वागत असेल, असे सूतोवाच करतानाच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘मात्र असा प्रस्ताव अद्याप त्यांच्याकडून आलेला नाही,’ असेही स्पष्टीकरण दिले.
उंब्रज येथे शुक्रवारी कऱ्हाड उत्तर मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ‘छत्रपतींना आमचा नेहमीच मानाचा मुजरा असतो. आमच्या पक्षात उदयनराजेंना नक्कीच आदराचे स्थान मिळेल,’ असे स्पष्ट करून चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले की, ‘आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील समविचारी पक्षांना सोबत घेऊन प्रचार करण्यासाठी भाजपाने तयारी दर्शविली आहे.’
शेंद्रे येथे ‘अजिंक्यतारा’च्या कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार यांनी उदयनराजेंचे नाव न घेता ‘पक्षाच्या मुळावर उठलेल्यांना बाजूला काढा!’ असा आदेश दिला होता. त्यानंतर उदयनराजेंची
भूमिका काय राहणार, याची चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली असतानाच चंद्रकांतदादा पाटील यांचे ‘उदयनराजेंना भाजपा
आवतन’ भविष्यातील धक्कादायक घडामोडींची नांदी ठरू शकते. (प्रतिनिधी)