भारनियमनाचे सूत्रच चुकीचे!

By Admin | Updated: May 30, 2014 09:07 IST2014-05-30T01:05:14+5:302014-05-30T09:07:50+5:30

चंद्रकांत शेळके, अहमदनगर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीजचोर्‍या, जुनाट वीज यंत्रणेमुळे होणारी गळती व बिलांची थकबाकी यामुळे महावितरणचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारनियमन या समस्येचा जन्म झाला.

The weightlifter is wrong! | भारनियमनाचे सूत्रच चुकीचे!

भारनियमनाचे सूत्रच चुकीचे!

चंद्रकांत शेळके, अहमदनगर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या वीजचोर्‍या, जुनाट वीज यंत्रणेमुळे होणारी गळती व बिलांची थकबाकी यामुळे महावितरणचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी भारनियमन या समस्येचा जन्म झाला. जो ग्राहक मुदतीत व प्रामाणिकपणे वीजबिल भरतो त्याला नाहक याचा फटका बसतो. चोर सोडून संन्याशाला फाशी या महावितरणच्या धोरणाला आता ग्राहकांमधून जोरदार विरोध होत आहे. ४२ टक्क्यांच्या पुढे गळतीचे प्रमाण गेले तर अशा फिडरवर सव्वासहा तास भारनियमन सध्या नगर शहरासह उपनगरांत होत आहे. त्याखालील फिडर भारनियमनमुक्त आहेत. परंतु इमर्जन्सी शटडाऊनचा फटका सर्वांनाच बसतो. मुळात भारनियमन होते कशामुळे, नियमित बिल भरणार्‍या ग्राहकांना त्याचा त्रास का, महावितरण वीजचोरांवर कडक कारवाई करून गळती नियंत्रणात का आणत नाही, जुनाट यंत्रणेत सुधारणा करून किंवा थकबाकीदारांचे वीजजोड खंडित करण्याचे धाडस का दाखवत नाही, याची उत्तरे अधिकार्‍यांकडून मिळत नाहीत. आम्ही नियमित बिल भरतो आम्हाला २४ तास वीज मिळाली पाहिजे एवढी साधी आणि सरळ मागणी ग्राहकांची असते. फिडरवरील १० ग्राहक बिल थकवतात किंवा वीजचोरी करतात. त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महावितरण निर्माण झालेली गळती भरून काढण्यासाठी इतर ९० लोकांना भारनियमनाचा झटका देते. याचाच संताप ग्राहकांमध्ये आहे. (समाप्त) वीजचोर बिनधास्त दिवसाढवळ्या वीजचोरी होते. वायरमन खांबाच्या खालून जातात, पण त्यांना टाकलेले आकडे दिसत नाहीत. विजेचे दर एवढे प्रचंड वाढले आहेत, त्यामुळे काटकसरीने वीज वापरावी लागते. झोपताना साधा झिरो बल्बसुध्दा लावत नाही अन् दुसरीकडे वीजचोर शेगड्या, हिटर बिनधास्त वापरतात. म्हणजे नियमित बिल भरून वीज वापरात काटकसर आम्ही करायची व त्यांनी फुकटात लागेल तेवढी वीज वापरायची, हा कोणता न्याय. - ईश्वर निमसे, ग्राहक भारनियमनाचे सूत्र बदला जो ग्राहक नियमित बिल भरतो, त्याला २४ तास वीज मिळालीच पाहिचे. तो त्याचा हक्क आहे. वीजचोरी, गळती, थकबाकी याला आळा घालणे हे सर्वस्वी महावितरणचे काम आहे. त्यावर त्यांनी काय उपाययोजना करायची हा त्यांचा प्रश्न. प्रामाणिक ग्राहकांवर झालेला अन्याय खपवून घेणार नाही. गळतीवर आधारित भारनियमनाचे हे सूत्रच चुकीचे असून, त्यात तातडीने बदल करण्याची गरज आहे. - आमदार अनिल राठोड राज्यस्तर अंमलबजावणी गळती व वसुली या सूत्रावरच संपूर्ण महाराष्ट्रभर भारनियमन होते. त्यात कोठेही बदल नाही. फिडरवरील वसुली १०० टक्के व गळती कमी असेल तर तेथील भारनियमन त्वरित रद्द केले जाते. त्यामुळे भारनियमनातून सुटका करणे हेही ग्राहकांच्याच हाती आहे. ४२ टक्क्यांच्या पुढे गळती असेल तर तेथे सध्या सव्वासहा तास भारनियमन आहे. दर महिन्याला त्यात बदल होतो. याबाबत निर्णयही वरिष्ठ स्तरावरूनच होतात. - प्रभाकर हजारे, अधीक्षक अभियंता

Web Title: The weightlifter is wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.