डान्स बारबाबत आठवड्यात निर्णय
By Admin | Updated: May 9, 2014 22:18 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T22:18:47+5:30
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून डान्स बारबाबत योग्य तो निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाईल

डान्स बारबाबत आठवड्यात निर्णय
आर. आर. पाटील : कायदेतज्ज्ञांशी चर्चा करणार
कवठेमहांकाळ (जि़ सांगली) : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवून डान्स बारबाबत योग्य तो निर्णय येत्या आठवड्याभरात घेतला जाईल, तसेच हा निर्णय घेत असताना कायदेतज्ज्ञांशी चर्चा, विनिमय केला जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान न करता जनतेला अपेक्षित असा निर्णय घेतला जाईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.
पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनता व शेतकरी कुटुंबातील तरुण या डान्स बारमुळे उद्ध्वस्त होऊ नये म्हणून राज्य सरकारतर्फे डान्स बारवर बंदी घातली होती़ परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने याबाबत बंदी उठविल्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे जनतेची मागणी व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश याचा मेळ घालण्यात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून येत्या आठवड्याभरात योग्य तो निर्णय घेतला जाईल. याबाबत दिल्लीतील व राज्य सरकारमधील कायदेतज्ज्ञांशी चर्चा करुन निर्णय घेतना जाईल, असे गृहमंत्री म्हणाले़ (वार्ताहर)