पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे
By Admin | Updated: June 30, 2016 16:03 IST2016-06-30T16:01:57+5:302016-06-30T16:03:18+5:30
भाजपा सरकारने वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला. पण पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसणार नाही, असा इशारा नितेश राणेंनी दिला.

पदाच्या खैरातीमुळे आम्ही गप्प बसणार नाही - आ. नितेश राणे
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३० - भाजपा सरकारने राज्यातील वेगवेगळ्या समाजातील नेत्यांना खासदार, आमदार ही पदे देऊन गप्प करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. अशा पदाच्या खैराती केल्याने मराठा समाज गप्प बसेल या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते आ. नितेश राणे यांनी दिला. मराठा-मुस्लिम आरक्षण यल्गार मेळाव्यासाठी नितेश राणे मंगळवारी करमाळ्यात आले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हे सरकार जनसंघाच्या इशार्यावर चालत असल्याचे सांगून निलेश राणे म्हणाले, मराठा-मुस्लिमांना कदापि आरक्षण देणार नाही, त्याच्या रक्तातच ते नाही. काँग्रेसच्या सरकारने नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण देऊ केले होते, पण विद्यमान सरकारने ते नाकारले. आपण राज्यभर मराठा-मुस्लिम समाजास आरक्षण मागणीसाठी मेळावे घेत असून करमाळ्यातील हा ११ वा मेळावा झाला आहे. एक दिवस असा उगवेल की आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र पेटून उठेल व सरकारला आरक्षण द्यावे लागेल.
आ. राणे म्हणाले, विधिमंडळात २८८ आमदारांपैकी मराठा समाजाचे १४५ आमदार आहेत. ओबीसी ४४, इतर जाती-जमातीचे ३0, परप्रांतीय इतर मागास ३0, परप्रांतीय १९, मुस्लिम १0 व ब्राह्मण १0 याप्रमाणे जातनिहाय बलाबल असताना राज्य मंत्रिमंडळात पाच महत्त्वाच्या खात्यांवर ब्राह्मण बसले आहेत. बाकीच्या लोकांकडे लायकी नाही का? असा सवाल करून राज्यातील लोकसंख्येच्या ३२ टक्के मराठा समाज असताना व या समाजाच्या मताच्या जीवावर निवडणुका जिंकून सत्ता भोगत असतानाही आरक्षण देत नाही, हा समस्त मराठा जातीचा अपमान आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष सचिन सातपुते, शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर-पाटील, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे-पाटील, पुणे विभाग अध्यक्ष किरणराज घाडगे, जिल्हाध्यक्ष संजय गुटाळ, नितीन खटके, नागेश माने, बलभीम राखुंडे, जगताप, सुनील सावंत, नितीन आढाव-पाटील, सचिन काळे, बाळासाहेब सुर्वे, अतुल फंड, विनय ननवरे, संतोष वारे, गणेश कुकडे, अमरजित साळुंखे उपस्थित होते.