त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 08:26 IST2025-07-17T08:25:05+5:302025-07-17T08:26:42+5:30
इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
मुंबई - राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्यावरून अलीकडच्या काळात बराच विरोध पाहायला मिळाला. त्रिभाषा अंतर्गत हिंदी भाषेच्या सक्तीला विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला. हिंदी सक्तीविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ना कुठला झेंडा, मराठीच अजेंडा अशी हाक देत सर्व मराठी भाषिकांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. राज यांच्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांनीही हिंदी सक्तीला विरोध केला. त्यानंतर अनेक सामाजिक संघटना, संस्था, साहित्यिक, कलाकार यांनीही सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. लोकांमधील आक्रोश पाहून फडणवीस सरकारने तात्काळ त्रिभाषा सूत्राबाबतचे दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा करत यावर समिती स्थापन केली. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा त्रिभाषा सूत्रावर ठाम भूमिका घेत आम्ही महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच असं विधान केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे किती पलटी मारू शकतात याचे उदाहरण म्हणजे त्रिभाषा सूत्राबाबत निघालेला जीआर आहे. मविआ सरकारने याबाबत समिती बनवली होती. त्यात भाषेबाबत उपसमिती होती, त्यात त्यांच्या पक्षाचा उपनेता होता. पहिलीपासून बारावीपर्यंत हिंदी आणि इंग्रजी बंधनकारक करा अशी शिफारस या समितीने दिली. हा अहवाल उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळात स्वीकारला. पुढच्या आठवड्यात पुष्टीकरणासाठी आला त्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी भूमिका बदलली. मी वाचलेच नाही असं ते म्हणाले. माध्यमांचे आश्चर्य वाटते. त्यांनी सांगितले आणि तुम्ही ऐकून घेतले. मी मुख्यमंत्री म्हणून म्हटलं असते मी वाचले नाही आणि कॅबिनेटमध्ये मंजूर केले तेव्हा मला फाडून खाल्ले असते. ४ दिवस जगू दिले नसते असं त्यांनी म्हटलं. मुंबई तकच्या विशेष कार्यक्रमावेळी फडणवीसांनी हिंदी आणि त्रिभाषा सूत्रावर भाष्य केले.
तसेच पहिल्यांदा हा जीआर निघाला, अनेकांशी चर्चा झाली. हिंदी सक्ती का असा प्रश्न उभा राहिला. मग आम्ही ठीक आहे इतर भाषा पर्याय असू शकतात म्हणून आम्ही जीआर बदलला. हिंदी बंधनकारक नाही, हिंदी घ्यायची तर घ्या अन्यथा इतर कुठलीही भारतीय भाषा घ्या परंतु त्यासाठी किमान २० विद्यार्थी हवेत. कारण २ विद्यार्थ्यांना तेलगू शिकायचे असेल तर त्यासाठी शिक्षक कुठून आणायचे, ते प्रॅक्टिकली शक्य नाही. मग तिसरीपासून का असा प्रश्न पुढे आला. आम्ही सगळा अभ्यास केला. त्यात २ मते पाहायला मिळाली. त्यात तिसरीपासून म्हणजे त्या वयात विविध भाषा शिकू शकतो आणि या भाषा शिकल्याने विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीचा विस्तार होतो. बौद्धिक विस्तार होतो या अभ्यास समितीच्या अहवालावरच केंद्र सरकारने शैक्षणिक धोरणात त्याची शिफारस केली आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
"१०० टक्के त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू करणारच"
दरम्यान, यावर वेगवेगळी मते आल्यानंतर आम्ही पुन्हा विचार केला, हा अहवाल आपल्या काळात आला नव्हता. त्यामुळे पुन्हा सर्वांची मते ऐकून घेतली पाहिजेत. त्यासाठी आम्ही समिती तयार केली आहे. आमच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय नाही पण एक गोष्ट निश्चित सांगतो, त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रात लागू होईलच. ते पहिलीपासून होईल की पाचवीपासून हे समिती ठरवेल मात्र १०० टक्के त्रिभाषा सूत्र आम्ही महाराष्ट्रात लागू करू आणि माझा सगळ्यात जास्त विरोध हा इंग्रजीला पायघड्या घालायचे आणि भारतीय भाषांना विरोध करायचा हे योग्य नाही. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
"राज ठाकरेंना घराबाहेर काढले, त्यांनी माझे आभार मानायला हवेत"
राज ठाकरे यांना मी घरातून बाहेर काढले नव्हते. माझा काय संबंध नव्हता. घरातून बाहेर काढणारे आहेत, आज त्यांनीही माझे आभार मानले पाहिजेत. ज्यांनी राज ठाकरेंना त्रास देऊन देऊन घरातून बाहेर काढले त्यांनीही माझे आभार मानायला हवेत, एकट्या राज ठाकरे यांनी का? कारण त्यांच्या मनात होते की नाही माहिती नाही. परंतु कदाचित राजकीय परिस्थिती पाहून त्यांच्या मनात तडजोडीबाबत येत असेल असं समजूया, ते माझ्यामुळे घडत असेल तर उत्तम आहे असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.