Deputy CM Eknath Shinde News: मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प आधीच्या सरकारने बासनात गुंडाळून ठेवला होता, मात्र आमच्या सरकारने तो पुन्हा सुरू केला असून मराठवाड्यातील ‘दुष्काळ’ हा शब्द कायमचा पुसून टाकण्याचा आमचा निर्धार आहे. यासाठी निधीची कमतरता कधीही भासू दिली जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कन्नड तालुक्याला आतापर्यंत अपेक्षेप्रमाणे विकास निधी मिळाला नसल्याचे मान्य करत, येत्या काळात कन्नडचा विकास बॅकलॉग भरून काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवगाव रंगारी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजना जाधव, आमदार प्रा.रमेश भोरनारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, उमेदवार आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत आहेत
सभेला उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत शिंदे म्हणाले की, राज्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे दुःखाचे सावट आहे. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत त्यांनी या कठीण काळातही निवडणुका टाळता येत नसल्याने प्रचार सभा घ्याव्या लागत असल्याचे सांगितले. ग्रामीण भागासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे ते म्हणाले. कन्नड, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतील सर्व पदाधिकारी, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले.
लाडकी बहीण योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळाल्याचा अभिमान
शिंदे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला. ज्या उमेदवारांच्या पाठीशी लाडक्या बहिणी उभ्या असतात, त्यांचा विजय निश्चित असतो, असा अनुभव विधानसभेपासून नगरपरिषद आणि महापालिका निवडणुकांपर्यंत घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या जीवनप्रवासाचा उल्लेख करत ते म्हणाले की, आपणही शेतकऱ्याचा मुलगा असून गरिबी, आईची तगमग आणि पत्नीची काटकसर जवळून पाहिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वप्रथम “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेवर विरोध झाला, न्यायालयात आव्हाने दिली गेली, मात्र आज या योजनेमुळे लाखो महिलांना आधार मिळाल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारने घेतला
या योजनेवर वर्षाला सुमारे ४५ हजार कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचा उल्लेख करत, हा खर्च अर्थव्यवस्थेला चालना देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक महिलांनी या रकमेतून लहान व्यवसाय सुरू केले, मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचार आणि घरखर्चाला हातभार लावला असल्याच्या यशकथा त्यांनी उदाहरणांसह मांडल्या. शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करताना त्यांनी पीक विमा योजना, नुकसान भरपाई, सततच्या पावसामुळे झालेल्या हानीसाठी ३२ हजार कोटींचे पॅकेज आणि शेतकरी कर्जमाफीचा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये सिंचन प्रकल्पांना मंजुरी दिली. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प पुन्हा सुरू करून दुष्काळ कायमचा संपवण्याचा संकल्प सरकारचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत कमी निधी मिळाल्याचा बॅकलॉग आता भरून काढला जाईल. रस्ते, पाणी, उद्योग, पर्यटन आणि जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकासाला गती दिली जाईल, असे आश्वासन दिले. संभाजीनगर हे ऐतिहासिक शहर आहे. जिल्हा परिषदवर विकासाचा भगवा फडकवायचा असेल, तर सर्व उमेदवारांना निवडून द्या. निधी कधीही कमी पडू देणार नाही, हा शब्द मी देतो. महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक हे सरकारचे केंद्रबिंदू असल्याचे सांगत, जे बोलतो ते करून दाखवतो, हा आमचा स्वभाव आहे, असे त्यांनी नमूद केले.
Web Summary : Deputy CM Eknath Shinde pledges to eliminate drought in Marathwada by reviving the water grid project. He promised ample funds and development for Kannad, emphasizing women's empowerment through schemes like 'Ladki Bahin Yojana' and highlighting the government's commitment to farmers and rural development.
Web Summary : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मराठवाड़ा में जल ग्रिड परियोजना को पुनर्जीवित कर सूखे को खत्म करने का संकल्प लिया। उन्होंने 'लाड़की बहीण योजना' जैसी योजनाओं के माध्यम से महिलाओं के सशक्तिकरण पर जोर दिया और किसानों व ग्रामीण विकास के लिए सरकार की प्रतिबद्धता को उजागर किया।