आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 06:34 IST2025-08-05T06:32:49+5:302025-08-05T06:34:16+5:30
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. मेळाव्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला होता.

आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
मुंबई : कुणासोबत पटत नाही, आवडत नाही असे चालणार नाही. २० वर्षांनंतर आम्ही दोघे भाऊ एकत्र आलो आहोत; पण तुम्ही एकमेकांशी का भांडता? तुम्ही एकत्र कधी येणार? असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी उद्धवसेनेच्या युतीबाबत प्रथमच भाष्य केले. महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे, असा विश्वासही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘मनसे’च्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा सोमवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात घेण्यात आला. मेळाव्यासाठी प्रसारमाध्यमांना प्रवेश नाकारला होता. तर, पदाधिकाऱ्यांचे स्कॅनिंग करून प्रवेश देण्यात येत असल्यामुळे अनेक पदाधिकाऱ्यांना बाहेर थांबावे लागले होते.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, जुने कार्यकर्ते, माजी पदाधिकारी, निवडणूक लढवलेले उमेदवार अशांना सोबतीला घेऊन पुढची वाटचाल एकत्र करायची आहे. प्रत्येक कार्यकर्ता आपला आहे. जुना सहकारी सोबत येत असल्यास मतभेद विसरून एकजुटीने काम करा, अशी सूचना राज यांनी केली.
मराठीच्या मुद्द्यावरून विनाकारण मारू नका. मराठी शिकायला, बोलायला कुणी तयार असेल तर शिकवा. वाद घालू नका; पण कुणी उर्मट बोलल्यास पुढील भूमिका घ्या. मुंबईत आपला पक्ष बलवान आहे. पक्षाच्या प्रतिमेला डाग लागणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला, असे नांदगावकर म्हणाले.
युतीसोबत योग्य वेळी बोलेन
महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा. मतदार याद्या व दुबार मतदानावर विशेष लक्ष केंद्रित करा. मुंबई महापालिकेत आपलीच सत्ता येणार आहे. युतीसंदर्भातील निर्णय घेऊन त्याबद्दल योग्य वेळी बोलेन. मात्र, एकमेकांना मानसन्मान दिला पाहिजे. आपण कसे वागतो त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत, असे सांगतानाच संघटनात्मक दृष्टिकोनातून काय करायला हवे, याबाबत राज यांनी मार्गदर्शन केले, असे बाळा नांदगावकर म्हणाले.