रेड झोनचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 02:09 IST2016-07-20T02:09:24+5:302016-07-20T02:09:24+5:30
रेड झोनचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून, लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला जाईल

रेड झोनचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर
देहूरोड : रेड झोनचा प्रश्न अंतिम टप्प्यात असून, लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे आश्वासन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दिले, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकारांना दिली.
मावळचे खासदार बारणे व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची दिल्ली येथे भेट घेऊन पुन्हा एकदा रेड झोनच्या प्रश्नाबाबत साकडे घातले. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा रेड झोनचा प्रश्न मार्गी लागावा, याकरिता खासदार बारणे व आढळराव पाटील पाठपुरावा करीत आहेत. आजही दोन्ही खासदारांनी संरक्षणमंत्र्यांची भेट घेतली. या प्रश्नाबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
बैठकीविषयी माहिती देताना बारणे म्हणाले, ‘‘सरंक्षणमंत्र्यांची भेट घेतली. त्यात रेड झोनचा प्रश्न अंतिम टप्प्यात आला असून, चालू लोकसभेचे अधिवेशन संपल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावत असून, त्यासाठी दिनांक २६ जुलैला रेड झोन क्षेत्रातील संसद सदस्यांबरोबर व संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलावली असून, लवकरच हा प्रश्न मार्गी लावणार आहे, असे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी दिले.’’ (वार्ताहर)