१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी
By Admin | Updated: June 12, 2015 00:45 IST2015-06-11T22:33:19+5:302015-06-12T00:45:37+5:30
भंडारमाची ग्रामस्थांमध्ये आनंदोत्सव : जलसंधारणांमुळे गावाची टॅँकरमुक्तीकडे वाटचाल -- गूज न्यूज

१९ वर्षांत प्रथमच आले नळाला पाणी
सातारा : कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत गावात सिमेंट नालाबांध मार्च २०१५ मध्ये पूर्ण करण्यात आला. परिणामी मेमध्ये झालेल्या वळवाच्या पावसामुळे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींचा जलस्तर वाढून १९ वर्षांत मे महिन्यात प्रथमच नळातून पाणी वाहू लागले. गावात झालेल्या जलसंधारणाच्या कामामुळे भंडारमाचीची वाटचाल आता टँकरमुक्तीकडे सुरू आहे. सुमारे एक हजार लोकसंख्या असणाऱ्या भंडारमाचीची ओळख दुष्काळग्रस्त म्हणून आहे. पाणी टंचाईच्या काळात जिल्ह्यात सर्वप्रथम भंडारमाचीला टँकरने पाणीपुरवठा केला जायचा. या गावामध्ये कृषी विभागामार्फत कोरडवाहू शेती अभियानांतर्गत सन २०१४-१५ मध्ये तीन सिमेंट नालाबांध, २४ शेततळे, २२ इलेट्रिक मोटरपंप संच, शेतकरी अभ्यास दौरा, एक शेतीशाळा, शंभर एकरवर पीक प्रात्यक्षिके, शेतकरी गट प्रमुखांचे प्रशिक्षण आदी कामे करण्यात आली.
लोकसहभागातून गाव तलावातील १५३ घनमीटर गाळ काढल्यामुळे उन्हाळी पावसात हा गाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला. गावामध्ये २४ शेततळी पूर्ण करण्यात आली. या शेततळ्यास अस्तरीकरण करून पावसाळ्यामध्ये पाणी साठवण्यात येणार आहे. याचा उपयोग पिकाला संरक्षित पाणी देण्यासाठी होणार आहे. यंदा मे महिन्यात प्रथमच विहिरींचा जलस्तर वाढल्याने भंडारमाची गावात १९ वर्षांनंतर नळाला पाणीपुरवठा झाल्याचे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. भंडारमाचीमध्ये झालेल्या जलसंधाणाच्या कामाबाबत शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीपाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. (प्रतिनिधी)
पाणीच-पाणी चोहीकडे
नालाबांधमुळे गावामधील नळपाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून ग्रामस्थांना सध्या भरपूर पाणी मिळत आहे. गावामध्ये ३५० हेक्टर कंपार्टमेंट बंडिंगचे काम झाले आहे. या कामामुळे भूजल पातळी वाढविण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. गावातील विहिरींची पाणीपातळी चार ते पाच फुटांनी वाढली आहे. ग्रामस्थांचे श्रमदान, कृषी विभागाच्या योजना यांच्या संगमातून जलसंधारणाचा खराखुरा परिणाम गावात पाहायला मिळत आहे.
- जितेंद्र शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी
दरवर्षी गावामध्ये दुष्काळ असायचा. गावामध्ये टँकर यायचा आणि पाणी भरण्यासाठी गर्दी व्हायची; पण यंदाच्या मे महिन्यात प्रथमच नळाला पाणी मिळाले आणि तेही भरपूर. आमचं गाव आता दुष्काळ मुक्तीकडे वाटचाल करत आहे, याचा आनंद वाटतो.
- प्रमिला जगदाळे,
महिला ग्रामस्थ
कृषी विभागामार्फत झालेल्या नालाबांधमुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींची पातळी १५ ते १६ फुटांनी वाढली आहे. निश्चितपणे भविष्यात भंडारमाची गाव टँकरमुक्त होईल.
- अजित जाधव, ग्रामसेवक
माझ्या विहिरीला पाणीच नसायचे. त्यामुळे दहा मिनिटे देखील मोटार चालत नव्हती. मार्चमध्ये झालेल्या नालाबांधमुळे माझ्या विहिरीला पाणी वाढले आहे. त्यामुळे आता शेतीला मुबलक पाणी मिळू शकेल.
- रामचंद्र मदने, शेतकरी