पाण्यासाठी शहापूरवासीयांची दिंडी
By Admin | Updated: May 18, 2016 05:02 IST2016-05-18T05:02:01+5:302016-05-18T05:02:01+5:30
उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

पाण्यासाठी शहापूरवासीयांची दिंडी
मुंबई : उभ्या मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूर तालुक्यातील नागरिकांनाच पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. परिणामी, संतप्त झालेले शहापूरवासीय मंगळवारी जलदिंडी घेऊन आझाद मैदानावर धडकले. मुंबई महानगरपालिकेने शहापूर तालुका दत्तक घेऊन टँकरमुक्त करावा, अशी त्यांची मागणी होती.
महानगरपालिकेचे लक्ष वेधण्यासाठी डोक्यावर कळशी घेऊन पदयात्रा स्वरूपात शनिवारी ही दिंडी शहापूरहून निघाली होती. सोमवारी रात्री मुंबई शहरात पोहचलेली दिंडी मंगळवारी राणीबागहून जे. जे. उड्डाणपुलावरून आझाद मैदानावर धडकली. या ठिकाणी जलदिंडीचे रूपांतर जाहीर सभेत झाले.
जलदिंडीचे आयोजक आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांनी सांगितले की, शहापूर तालुक्यातील तानसा, वैतरणा व भातसा या तीन प्रमुख धरणांतून मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. तानसा आणि वैतरणा धरणांतून मुंबईकरांना प्रतिदिन प्रत्येकी ४५५ दशलक्ष लीटरप्रमाणे ९१० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. शिवाय एकट्या भातसा धरणातून सर्वाधिक म्हणजे प्रतिदिन २ हजार ५० दशलक्ष लीटर पाणी पुरवले जाते. म्हणजेच मुंबईकरांना प्रतिदिन २ हजार ९६० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो.
>...तर शहापूरची वर्षभराची तहान भागेल
शहापूर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाच्या अहवालानुसार, शहापूर तालुक्यातील शहरी भागाला प्रतिदिन ४९ लाख ४९ हजार ७०० लीटर आणि ग्रामीण भागाला ९७ लाख ३५ हजार ७२० लीटर म्हणजेच एकूण १७.६२ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार संपूर्ण शहापूरला प्रतिवर्ष ६ हजार ४३१ दशलक्ष लीटर पाण्याची गरज आहे. यानुसार मुंबईला लागणाऱ्या एका दिवसाचा पाणीपुरवठा शहापूर तालुक्याला केल्यास शहापूरवासीयांची संपूर्ण वर्षाची तहान भागेल.
>मुख्यमंत्री प्रश्न सोडवणार
जलदिंडीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दुपारी भेट घेतली. त्यानंतर झालेल्या चर्चेत शहापूरचा पाणीप्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले, अशी माहिती जलदिंडीचे संयोजक संतोश शिंदे यांनी ‘लोकमत’ला दिली.