मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा उरला असल्याने पावसाळा येईपर्यंत पाण्याचे संकट कायम आहे़ अशा वेळी २४ तासांत दोन ठिकाणी जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडल्या आहेत़ यामध्ये बुधवारी रात्री असल्फा येथे फुटलेल्या जलवाहिनीचे पाणी स्थानिक नागरिकांच्या घरात शिरले होते़, तर आज जोगेश्वरी येथे जलवाहिनी फुटली़घाटकोपर येथील असल्फामध्ये श्रीधर परब मार्गावर बुधवारी रात्री ११़३० च्या दरम्यान, ७२ इंचांची तानसा जलवाहिनी फुटली़ यामुळे लाखो लीटर पाणी वाहून गेले़ हे पाणी स्थानिक रहिवाशांच्या घरात शिरले़ तसेच रस्त्यावर उभ्या मोटारसायकलही या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होत्या़ भाजपा कार्यकर्ते प्रकाश मोरे आणि अनुप राजाळकर यांनी घरदुरूस्तीसाठी रहिवाशांना मदत केली. लाखो लीटर पाणी वाया गेल्याने असल्फा गाव एनएस रोड, खैरानी रोडसह कांदिवलीतील रहेजा संकुलातील पाणीपुरवठ्यावर आज परिणाम झाला़ पालिकेने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेतले खरे, मात्र या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सकाळी १० नंतरच पूर्ण झाले़ मात्र ही जलवाहिनी दुरस्त होत नाही तोच जोगेश्वरी पूर्व येथील बांद्रेकरवाडीत १२ इंचांची जलवाहिनी फुटली़ त्यामुळे पुन्हा हजारो लीटर पाणी वाहून गेले़ या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)अधिकारी बेपत्ताअसल्फा येथील जलवाहिनी फुटल्यानंतर ही माहिती स्थानिक विभागातील अधिकाऱ्यांना देण्यासाठी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला तब्बल दोन तास शोधाशोध करावी लागली़ अधिकारी संपर्क कक्षेच्या बाहेर असल्याने अखेर दोन तासांनंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीला सुरुवात झाली़
ऐन पाणीटंचाईत शहरात दोन जलवाहिन्या फुटल्या
By admin | Updated: June 10, 2016 02:02 IST