जलाशयांची जलसाठ्याची क्षमता घटली, रोबोटिक यंत्राद्वारे गाळ काढणार
By Admin | Updated: August 16, 2016 20:56 IST2016-08-16T20:56:06+5:302016-08-16T20:56:06+5:30
मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे़

जलाशयांची जलसाठ्याची क्षमता घटली, रोबोटिक यंत्राद्वारे गाळ काढणार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने पाणी साठविण्याची जलाशयांची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयांची साफसफाई रोबोटिक यंत्राद्वारे पुन्हा एकदा केली जाणार आहे. या आधुनिक यंत्रामुळे जलाशय रिकामी अथवा पाणीपुरवठा खंडित न करताच ही सफाई होऊ शकणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांतून आलेल्या पाण्याचा साठा जलाशयांमध्ये केला जातो. त्यातूनच पुढे सर्व विभागांना पाणीपुरवठा होत असतो़ मात्र पाण्यातील गाळ व जलवाहिनींमधील गंजाचे कणही याबरोबर जलाशयामध्ये साठत असतात. हा गाळ कालांतराने तळाशी साचून जलाशयांमधील जलसाठ्याची क्षमता कमी होते. २००५ ते २००९ मध्ये पूर्व उपनगरातील सात जलाशय व २००९ ते २०१४ या काळात शहरातील सहा जलाशयांची सफाई रोबोटिक यंत्राद्वारे करण्यात आली. मात्र आधी सफाई झालेल्या जलाशयांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पुन्हा गाळ जमा झाला आहे. त्यामुळे या जलाशयांची तातडीने सफाईची आवश्यकता आहे़ यासाठी ११ कोटी ७६ लाख रुपये पालिका खर्च करणार आहे. यामुळेच सफाईची गरज तानसा, वैतरणा, भातसा या तलावांमधील पाणी जलाशयांमध्ये जमा होत असते. मात्र पाण्याबरोबर गाळ व जलवाहिन्यांचे गंजलेले कणही जलाशयांच्या तळाशी जमा होत असतात़ कालांतराने हे थर वाढून जलाशयांमधील पाणी साठविण्याची क्षमता कमी होत जाते. यामुळेच सफाईची तातडीने गरज आहे, अशी सफाई स्वयंचलित स्वच्छता यंत्र गाळ शोधून उपसण्यासाठी उपयुक्त आहे, यासाठी जलाशय रिकामे अथवा पाणीपुरवठा खंडित न करता जलाशयाच्या तळाशी असलेल्या गाळाची स्थिती व तळाची अवस्था पाहता येते़ तसेच हा गाळ पाण्यात मिसळू न देताच गाळ बाहेर काढणे शक्य होते. गाळ काढण्याच्या प्रक्रियेवर संगणकाद्वारे नियंत्रण ठेवले जाते.