लोकसहभागातून जलसमृद्धी
By Admin | Updated: October 8, 2016 02:01 IST2016-10-08T01:59:30+5:302016-10-08T02:01:18+5:30
पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे.

लोकसहभागातून जलसमृद्धी
जयंत धुळप,
अलिबाग- पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्यभरात जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. पाणीटंचाईमुक्तीसाठी रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत जलयुक्त शिवार योजनेबरोबरच तलावामधील गाळ काढण्यासाठी लोकसहभागातून हाती घेण्यात आलेल्या मोहिमेस अनन्य साधारण यश प्राप्त झाले आहे. गावोगावच्या लोकांच्या श्रमदान मोहिमेतून १५ तालुक्यांतील एकूण ३२ विविध ठिकाणच्या नदी-तळी-तलावांमधील तब्बल ५ लाख २ हजार ७७४ घनमीटर गाळ उपसून काढून हे जलस्रोत स्वच्छ करण्यात आले. या सर्व गाळ उपसण्यामुळे तब्बल ५०२ टीसीएम अशी विक्रमी जलसाठवण क्षमता वृद्धिंगत करुन दाखवण्याची किमया गावोगावच्या ग्रामस्थांनी करुन दाखविली आहे.
रायगड जिल्ह्यातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार योजनेबरोबरच जिल्ह्यात असलेल्या तलाव, धरणातील गाळ काढण्याची मोहीम लोकसहभागातून राबविण्यात आली. रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांचा विचार करता थोडेसे अवघड वाटणारे काम रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणेने केलेले सुयोग्य नियोजन आणि सामाजिक संस्था व नागरिक यांचा स्वेच्छा सक्रिय सहभाग यामुळे यशस्वी झाले
पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे बळकटीकरण, सिमेंट बंधारे, माती बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव यासारख्या अस्तित्वात असलेल्या व निकामी झालेल्या जलस्रोतांची जलसाठवण क्षमता पुन:र्स्थापित करणे, जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे, पाण्याच्या ताळेबंधाबाबत जनतेत जाणीव व जागृती निर्माण करणे, गाळ काढण्याचा मोहिमेची उद्दिष्टे सांगून जनसामान्याचा सहभाग वाढवणे असा उद्देश या मोहिमेमागे होता.
प्रत्येक तालुक्यामधील तहसीलदार तसेच महसूल यंत्रणा यांनी आपल्या परिसरातील तलाव, धरण यांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर गाळ काढण्यासाठी तलाव व धरणाची निवड केली. लोकांमध्ये याबाबत जागृती करून त्यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार लोकसहभागातून काम करण्यात आले.
>गावातील भूजलात वाढ
जलसाठ्यांची क्षमता वृद्धीकरण झाल्यामुळे गाव क्षेत्रातील भूजलात वाढ झाली आहे. गाळ काढून तो शेतात टाकल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढली असून मृदसंधारणात वाढ झाली आहे. गुरांना पिण्याच्या पाण्याची सोय झाली तर शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करणे शक्य झाले आहे.