दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे ‘घड्याळ’

By Admin | Updated: July 4, 2016 03:59 IST2016-07-04T03:59:23+5:302016-07-04T03:59:23+5:30

एका तरुणाने घड्याळ तयार केले असून, त्यातील ‘पॅनिक बटन’ दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे.

The watchman 'watch' | दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे ‘घड्याळ’

दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे ‘घड्याळ’

सतीश डोंगरे,

नाशिक- तंत्रज्ञानावर स्वार झालेल्या येथील एका तरुणाने घड्याळ तयार केले असून, त्यातील ‘पॅनिक बटन’ दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सहाय्यभूत ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या घड्याळाचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या घडाळ््याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. दीड कोटी रुपये खर्चून हे संशोधन करणाऱ्या युवकाला मात्र बँकांनी कर्ज देण्यास नकार दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नाशिकरोड येथील आनंद सुंदरराज याने दहशतवाद्यांचा चेहरा टिपणारे आधुनिक तंत्रज्ञानाचे हे घड्याळ विकसित केले आहे. संशोधनासाठी त्याने चेन्नई येथील आयटी कंपनीतील नोकरी सोडली. मोबाइलच्या जमान्यात सहज कोणालाही वापरता येईल, असे उपकरण म्हणून त्याने घड्याळाची निवड केली. तब्बल पाच वर्ष संशोधन केल्यानंतर त्याने आपत्कालीन परिस्थितीत ‘पॅनिक बटन’ दाबल्यास त्वरित यंत्रणा कार्यान्वित होऊन व्हिडीओ, आॅडिओ स्वरूपात माहिती संकलित करणाऱ्या घड्याळाचा शोध लावला. त्याचे पॅनिक बटन दाबल्यास पोलीस यंत्रणा, सुरक्षा एजन्सी, यांच्या सर्व्हरवर संदेश पोहचतो. यंत्रणा सतर्क होते. आनंदराजने पुणे येथे ‘मेक इन इंडिया’च्या कार्यशाळेत सादरीकरण केल्यानंतर आयोजकांनी त्याच्या या आविष्काराची थेट वॉशिंग्टन डीसी येथे झालेल्या ७० देशांच्या ‘इनोव्हेशन अ‍ॅण्ड इन्वेस्टमेंट समीट - २०१६’साठी निवड केली.
आनंदने तेथे बराक ओबामा यांच्यासमोर घड्याळाचे प्रात्यक्षिक सादर केल्यानंतर त्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. अमेरिका, हॉलंड, बांगलादेश, सिंगापूर, कॅनडा, बुधापेस्ट व युरोपमधील काही देशांनी आनंदशी व्यावसायिक स्तरावर प्राथमिक चर्चादेखील केली आहे.
>सुरक्षेच्यादृष्टीने उपयुक्त
घड्याळात स्मार्टफोन उपलब्ध असून, ‘पॅनिक बटन’ सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे.
बटन दाबल्यानंतर ३० सेकंदांचा आॅडिओ किंवा व्हिडीओ तयार होतो. जवळचे पोलीस स्टेशन किंवा सुरक्षा एजन्सीच्या सर्व्हरवर तो आपोआप धडकतो.
कोणत्याही देशात हे घड्याळ वापरता येईल. तसा प्रोग्रामच त्यात आहे.
>पेटंटला मान्यता
भारतासह तब्बल ३८ देशांनी आनंदच्या या घड्याळाचे पेटंट मान्य केले आहे. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात हे उपकरण सुरक्षेच्यादृष्टीने फायदेशीर ठरणार असल्याचे तज्ज्ञांनी मान्य केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून विचारणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडून आनंदला घड्याळाबाबत विचारणा झाली आहे. तो पंतप्रधानांना प्रात्यक्षिक दाखविणार आहे.
सोने गहाण ठेवून अमेरिकेची वारी
च्आनंदला संशोधनासाठी आतापर्यंत दीड कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्याने पत्नीचे सोने व वाहन गहाण ठेवून अमेरिकेची वारी केली.
>मी तयार केलेल्या घड्याळाचे जगात कौतुक होत असले तरी भारतात त्यास हवे तसे पाठबळ मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. नवसंशोधकांना चालना मिळावी यासाठी आम्ही आमच्या वित्तपुरवठ्याच्या पॉलिसींमध्ये-देखील बदल करू शकतो, असे ओबामा यांनी सांगितले. मग भारतातच उदासीनता का? - आनंद सुंदरराज, संशोधक

Web Title: The watchman 'watch'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.