अचानक श्रीमंत होणाऱ्या उमेदवारांवर वॉच
By Admin | Updated: January 21, 2017 01:22 IST2017-01-21T01:22:58+5:302017-01-21T01:22:58+5:30
नगरसेवक झाला अन् पाच वर्षांत संपत्ती दहा पटीने वाढल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात.

अचानक श्रीमंत होणाऱ्या उमेदवारांवर वॉच
पुणे : नगरसेवक झाला अन् पाच वर्षांत संपत्ती दहा पटीने वाढल्याची अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. अशा अचानक श्रीमंत होणाऱ्या उमेदवारांना चाप लावण्यासाठी राज्य निवडणूक आयोगातर्फे वॉच ठेवला जाणार आहे.
उमेदवार अर्ज दाखल करताना मागील लढविलेल्या निवडणुकीच्या वेळी जाहीर केलेल्या स्थावर व जंगम मालमत्तेचा हिशोब देखील यावेळी उमेदवारांना द्यावा लागणार आहे. तसेच यावेळी प्रथमच पॅन कार्डची माहिती देणे देखील बंधनकारक आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना अर्जासोबत विविध प्रकारची शपथ पत्र दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये वय, शिक्षण, व्यवसाय, अपत्यांची संख्या आदी माहिती सोबतच दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीकरित शिक्षा होऊ शकेल अशी प्रलंबित प्रकरणांची माहिती, गुन्ह्याची माहिती उमेदवाराचा पॅन क्रमांक, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न, जंगम व स्थावर मालमत्तेचा तपशील, एकूण मालमत्ता यांचा तपशील द्यावा लागणार आहे.
या पवित्र्यामुळे प्रथमच मागील निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची संपत्ती किती होती व त्यानंतर संपत्तीत किती वाढ झाली हे मतदारांना कळणार आहे. तसेच एकूण वार्षिक उत्पन्न काय व त्याचे स्त्रोत देखील जाहीर करावे लागणार आहे.