वाशिम जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा!
By Admin | Updated: July 5, 2014 23:49 IST2014-07-05T23:26:33+5:302014-07-05T23:49:51+5:30
कुपोषित बालकांची संख्या हजारावर : मानोरा तालुक्यात सर्वाधिक कुपोषण

वाशिम जिल्ह्याला कुपोषणाचा विळखा!
वाशिम : राज्यात विकासाच्या बाबतीत पिछाडीवर असलेल्या वाशिम जिल्हा कुपोषाच्या विळख्यात सापडला असल्याचे महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. मानोरा तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सर्वाधिक असून वाशिम तालुक्याचा याबाबत दुसरा क्रमांक आहे.
बालकांचे कुपोषण ही आज सार्वत्रिक समस्या बनली आहे. केवळ ग्रामीण व दुर्गम आदिवासी भागातच बालकांचे कुपोषण आहे असे नव्हे तर विकासात पुढे असणार्या शहरी भागातही आता बालकांचे कुपोषण आढळून येत आहे.
** महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे वय व वजनाच्या आणि उंची व लांबीच्या अशा दोन निकषानुसार दरमहा सर्वेक्षण केले जाते. यासंदर्भात वाशिम जिल्हय़ात जून महिन्यात शुन्य ते सहा वयोगटातील ९२,३७२ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात वाशिम तालुक्यातील १७८८९, रिसोड १५१७५, मालेगाव १८३७४, मंगरुळपीर १३,८१0, कारंजा ११३८७ व मानोरा तालुक्यातील १५७३७ बालकांचा समावेश होता.
यापैकी वय व वजनानुसार ८४९८0 बालक सामान्य श्रेणीत आढळले. किमान वजन निकषाखाली कुपोषित श्रेणीत ६३२२ तर कमाल वजन निकषाखालील तीव्र कुपोषित बालकांच्या श्रेणीत १0७0 बालक असल्याचे आढळून आले.
** याचप्रमाणे लांबी उंचीनुसार ९२,३७२ बालकांच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणात ९१,४७२ बालक सर्वसाधारण श्रेणीत असल्याचे आढळून आले. यापैकी किमान लांबीव उंचीच्या निकषाखालील कुपोषित श्रेणीत ७२१ तर कमाल लांबी व उंचीच्या निकषाखालील तीव्र कुपोषित श्रेणीत १७९ बालक असल्याचे आढळून आले.
यात कुपोषणाच्या सर्वेक्षणाच्या दोन्ही पद्धतीत मानोरा तालुक्यात सर्वाधिक तर वाशिम तालुक्यात त्या खालोखाल कुपोषित बालक आढळून आले आहेत.
** मागीलवषी जिल्ह्यामध्ये पावसाळय़ात अतवृष्टीने तर हिवाळय़ात गारपिटीने पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांची स्थिती यंदा हलाखीची झाली आहे. अशा स्थितीचा परिणाम बालक कुपोषित होण्यावर झाला आहे.वाशिम जिल्हय़ात मानोरा तालुका जिल्हय़ातील सर्वच तालुक्यांपेक्षा विकासाच्या प्रक्रियेत मागासलेला आहे. जिल्हय़ातील कारंजा तालुका वगळता अन्य पाच तालुक्यात एमआयडीसीने औद्योगिक वसाहती विकसित केल्या असल्या तरी तेथे एकही मोठा उद्योग आजस्थितीत सुरु नाही. परिणामी, शेती व लहान-मोठे व्यवसाय हेच लोकांचे रोजगाराचे साधन आहे. त्यातही जिल्हय़ातील लागवडीयोग्य ४ लाख ३१ हजार शेतजमिनीपैकी केवळ ६८ हजार हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली असल्यामुळे बहुतांश शेतकर्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कोरडवाहू शेती व रोजमजुरी हे आहे.