Warning to Shrivardhan-Harihareshwar | Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

Nisarga Cyclone: श्रीवर्धन-हरिहरेश्वरला सतर्कतेचा इशारा

अलिबाग/पालघर : रायगड, पालघर किनारपट्टी आणि दमणला बुधवारी, ३ जूनला असलेला चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनांनी सतर्कतेचे आदेश दिले आहेत. रायगडच्या श्रीवर्धन- हरिहरेश्वर किनारपट्टीला हे वादळ आदळेल, असा सध्याचा अंदाज आहे. त्यामुळे या भागांसह किनारपट्टी परिसरातील दुकाने, कारखाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अरबी समुद्रात मंगळवारी चक्रीवादळ तयार होण्याची भीती हवामान विभागाने व्यक्त करताच जिल्हा प्रशासन सकाळपासूनच कामाला लागले. राज्याचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे-निंबाळकर यांनी किनारपट्टी भागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची सायंकाळी तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली.


चक्रीवादळाचा सामना करताना घ्यायची खबरदारी आणि उपाय योजना याबाबत चर्चा झाली. बैठक उशिरापर्यंत सुरू होती. ही बैठक संपल्यानंतर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्व तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांची व्हिडीओ कॉन्फरन्स बोलवल्याची माहिती सूत्रांनी दिली.


पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे व पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनीही उपाययोजनांची माहिती दिली. वादळाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोस्ट गार्ड, आयएमआरडी, राज्य आपत्कालीन यंत्रणेशी आपण सतत संपर्कात असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान, चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे निवासी जिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी सांगितले.


रेशनिंग दुकाने बंद
किनारपट्टी भागात ३ जूनला रेशनिंग दुकाने व किरकोळ केरोसिन परवानाधारकांची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या दिवशी अन्नधान्याचे वितरण होणार नाही.

रायगडमध्ये हेल्पलाइन : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांनी आपत्कालीन प्रसंगी कोस्टल हेल्पलाइन क्र मांक १०९३ व पोलीस नियंत्रण कक्ष ७४४७७११११० वर अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.

ठाणे, पालघरच्या ५७७ बोटी अद्यापही समुद्रात
मासेमारी बंदी कालावधी सुरू झालेला असतानाही पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ५७७ मच्छीमार बोटी समुद्रात असल्याने कोस्टगार्डमार्फत त्यांना माघारी आणण्याचे काम सुरू झाले आहे.
तारापूरचे कारखाने उद्या बंद
तारापूर एमआयडीसीसह सर्व औद्योगिक कारखाने बुधवारी बंद ठेवण्याबाबत टीमा संघटनेशी बोलणे झाल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबईत पावसाची हजेरी
मुंबई : सोमवारी पहाटे मुंबई शहरासह उपनगरात विजांचा कडकडाट, ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या मान्सूनपूर्व सरींमुळे वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाला. चेंबूर, कुर्ला, सायन अंधेरी, दादरसह दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम मुंबई अशा बहुतांश सर्वच ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. पावसाने नंतर विश्रांती घेतली असली तरी मुंबई शहर आणि उपनगरावर दिवसभर ढग दाटून आले होते.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Warning to Shrivardhan-Harihareshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.