वानखेडे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
By Admin | Updated: May 30, 2014 01:15 IST2014-05-30T01:15:14+5:302014-05-30T01:15:14+5:30
हितवाद वृत्तपत्र समूहाचे जाहिरात व्यवस्थापक समीर कृष्णराव वानखेडे (५0), त्यांच्या पत्नी तिरुपती बँकेच्या व्यवस्थापिका दीप्ती समीर वानखेडे (४५) आणि त्यांच्या गाडीचा चालक अनिल मंडपे (४७) यांचा

वानखेडे दाम्पत्याचा अपघाती मृत्यू
सौंसरजवळ अपघात : चालक ठार, मुलगा गंभीर
नागपूर : हितवाद वृत्तपत्र समूहाचे जाहिरात व्यवस्थापक समीर कृष्णराव वानखेडे (५0), त्यांच्या पत्नी तिरुपती बँकेच्या व्यवस्थापिका दीप्ती समीर वानखेडे (४५) आणि त्यांच्या गाडीचा चालक अनिल मंडपे (४७) यांचा गुरुवारी दुपारी ४ वाजता छिंदवाडा मार्गावर सौंसरजवळ एका भीषण अपघातात मृत्यू झाला.
या अपघातात समीर वानखेडे यांचा मुलगा दर्श (२0) हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी खामला येथील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. वानखेडे दाम्पत्य हे अत्रे ले-आऊट येथील दत्ता मेघे पॉलिटेक्निकजवळील रहिवासी होते, तर मंडपे हा फ्रेंड्स कॉलनी, गिट्टीखदान येथील रहिवासी होता. प्राप्त माहितीनुसार, वानखेडे दाम्पत्य पचमढी येथून सॅन्ट्रो कारने (एमएच-३१/सीएस-७८४) नागपूरला परतत होते.
छिंदवाडा जिल्ह्यातील सौंसरपासून तीन कि.मी. अंतरावरील भन्साली इंजिनिअरिंग पॉलिर्मस लिमिटेडजवळ समोरून वेगाने येणार्या ट्रकने (एमएच-४0/एन-४४0२) त्यांच्या कारला आमोरासमोर धडक दिली. समीर वानखेडे यांचा जागीच तर दीप्ती वानखेडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताने या मार्गावरील वाहतूक एक तास खोळंबली होती. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव नागपुरात आणण्यात येणार आहे.
अन् तो क्षणात झाला पोरका !
नागपूर : गेले काही दिवस आई - वडिलांसह तो आनंदात होता. नोकरीच्या ताणतणावात कुटुंबाला फारसा वेळ देता येत नाही म्हणूनच अख्खे कुटुंब पचमढीला गेले होते. दर्शने जेमतेम तारुण्याच्या उंबरठय़ावर पाय ठेवलेला. त्यामुळे पालक या नात्याने स्वाभाविकपणे त्यांना मुलाच्या भविष्याचीही चिंता होती. या निवांत वेळात दर्शच्या शिक्षणाविषयी आणि भविष्याबाबत बरेच बोलणे झाले. त्यांचा एकुलता एक मुलगाच तो. सारी स्वप्ने डोळ्यात होती आणि त्यांच्या पुर्णत्वासाठीच तर सारे परिश्रमही होते. पण नियतीच्या मनात मात्र काही वेगळेच होते. आपल्या पालकांच्या स्वप्नांना पुर्णत्वास नेऊन त्यांच्या चेहर्यावर समाधानाचे आनंदाश्रु पाहण्याची संधीच त्याला मिळाली नाही. हसत्या - खेळत्या कुटुंबावर नियतीने डाव साधला अन् दर्श क्षणात पोरका झाला.
पचमढीवरुन निघाल्यावर सारेच आनंदात होते. दैनंदिन जीवनात मनावर येणारी सारी मरगळ झटकली गेली होती. सारेच आनंदातच होते. आपल्या निवासस्थानी परतण्याचा आणि नव्या आनंदात भविष्य साकारण्याचा त्यांचा विचारच सुरु होता. पण अचानक घात झाला..ही वेळ होती सायंकाळी ४ वाजताची. सौंसर शेजारी काही कळण्याच्या आत जोरदार धक्का कारला बसला. प्रचंड आवाज झाला. यात २0 वर्षांंंंचा दर्श जखमी होऊन बेशुद्ध पडला आणि त्याची आई दिप्ती, वडिल समीर वानखेडे यांचा या अपघातात घटनास्थळीच मृत्यू झाला. भीषण अपघात झालेला पाहून रस्त्याने आवागमन करणारी वाहने थांबली. आजुबाजूचे नागरिकही मदतीला धावून आले. या अपघातात कारचालक अनिल मंडपे यांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी कारमधील लोकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. पण दर्श वगळता सार्यांचाच श्वास थांबला होता. तरुण पोराचा श्वास सुरु असल्याने तत्काळ लोकांनी मदत केली. घटनेनंतर दर्शला रात्री ८ वाजताच्या सुमारास तत्काळ अँम्बुलन्सने खामला येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन दर्शवर उपचार केले. या उपचारांना फळ आले. काही वेळाने दर्श शुद्धीवर आला. शुद्धीवर आल्यावर तो जखमी अवस्थेतच क्षीण आवाजात मावशीसोबत बोलला, असे काहींनी सांगितले. या अपघातातून दर्शला जीवनदान मिळाले असले तरी त्याचे आई - वडिल मात्र कायमचे हिरावले. आपण पोरके झाल्याची पुसटशीही कल्पना त्याला नाही आणि ही दु:खाची बातमी त्याला सांगण्याची ही वेळही नाही. ही बातमी सांगण्याची कुणाची हिंमतही नाही. बस्स..दर्र्श या अपघातातून चांगला व्हावा, अशीच सार्या नातेवाईकांची इच्छा आहे. रात्री ९ वाजताच्या सुमारास दर्शचे सिटी स्कॅन व एक्सरे काढण्यात आले. यात त्याचा एक पाय आणि हात फ्रॅक्चर असल्याचे आढळून आले आहे. पण त्याचा जिविताला धोका नाही, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. दर्शच्या या जखमा उपचारांनी बर्या होतील पण आपण पोरके झाल्याची त्याच्या मनावर होणारी जखम मात्र आयुष्य व्यापून उरणारी आहे. या दु:खातून त्याला सावरता यावे, अशी प्रार्थना सध्या सारेच नातेवाईक करीत आहेत. दर्श हा समीर व दीप्ती वानखडे यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो दत्ता मेघे पॉलिटेक्निक महाविद्यालयात तृतीय वर्षाला शिकत आहे. दर्शला ऑरेंट सिटी हॉस्पिटलमध्ये भरती केल्याची नातेवाईकांना माहिती कळताच, त्याला पाहण्यासाठी एकच गर्दी झाली होती. डॉक्टरांनी त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगताच सर्वांंंच्या चेहर्यावर सुखद भाव दिसून आला. मात्र त्याच वेळी समीर व त्यांची पत्नी गेल्याचे दु:ख ते लपवू शकत नव्हते. रात्री उशिरापर्यंंंंत समीर यांचे नातेवाईक व मित्र मंडळींची हॉस्पिटलमध्ये ये-जा सुरू होती. येथे येणारा प्रत्येकजण या अपघाताबाबत हळहळ व्यक्त करीत होता. (प्रतिनिधी)