शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:54 IST2025-10-31T15:53:37+5:302025-10-31T15:54:12+5:30

कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

Waive off farmers loans immediately without delay; Uddhav Thackeray demand to the CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी

मुंबई - प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूर येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला. या आंदोलनाची दखल घेत कडू आणि इतर शेतकरी नेत्यांसोबत राज्य सरकारने बैठक आयोजित केली. त्यात ३० जून २०२६ पर्यंत शेतकरी कर्जमाफी जाहीर करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळाला दिले. त्यानंतर बच्चू कडू यांनी हे आंदोलन मागे घेतले. मात्र सरकारच्या या निर्णयावर टीका करत उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना झुलवत न ठेवता तात्काळ कर्जमाफी करा अशी मागणी केली आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढत म्हटलंय की, कर्जाच्या डोंगराखाली शेतकरी खचला आहे. निसर्ग कोपलाच आहे. त्यात संवेदना नसलेल्या सरकारचा तुघलकी कारभारः अशा अस्मानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सरकारने लोणकढी थाप मारून वेळ काढायचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीसाठी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यातून पुढील प्रश्नांची उत्तरे मिळतील काय? शेतकऱ्यांची दैनावस्था समोर दिसत असताना तुमची परदेशी समिती नेमका कसला अभ्यास करून अहवाल देणार? पुढच्या वर्षी जूनमध्ये जर खरंच कर्जमाफी होणार असेल तर आत्ताच्या कर्जाचे हप्ते भरायचे का? पुढील वर्षी जुनच्या कर्जमाफीत हे हप्ते माफ होणार असतील तर ते का भरायचे? ते न भरता शेतकऱ्यांना रब्बीसाठी कर्ज मिळणार आहे का? जर नव्याने कर्ज मिळणार असेल तर ते देखील माफ होणार का? या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. 

तसेच इतर मदत करण्याआधी खरडून गेलेली जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी माती मागतो आहे. पण त्याविषयी सरकार काहीच करायला तयार नाही. जगाचे पोट भरणारा शेतकरी आज भयंकर संकटात सापडला आहे. पाऊस अजूनही शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. सरकारने हजारो कोटींच्या नुकसानभरपाईची घोषणा केली, पण शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे जमा झाले हा प्रश्नच आहे. महाराष्ट्रात सहा महिन्यांपासून पाऊस पडतो आहे. शेतकरी पूर्णपणे उ‌द्ध्वस्त झाला आहे. कर्जमुक्ती देण्याची यापेक्षा आणखी योग्य वेळ कोणती असू शकते? तरीही योग्य वेळ आल्यावर कर्जमुक्ती देऊ असे सांगून सरकारने जो वेळकाढूपणा चालवला आहे, ती शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे. 

दरम्यान, मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातून सातत्याने शेतकरी आत्महत्यांच्या बातम्या येत आहेत. आत्महत्यांचे हे वाढते आकडे सरकारच्या कानावर आदळत नाहीत काय? तरीही सरकारने कर्जमुक्तीसाठी पुढच्या वर्षी जूनचा मुहूर्त काढावा, हे चीड आणणारे व शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे. कर्जमुक्तीसाठी चालढकल करून हे सरकार शेतकऱ्यांना मृत्यूच्या दारात ढकलत आहे. जूनपर्यंत होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी सरकार घेणार आहे काय? सरकार शेतकऱ्यांना केवळ खेळवत आहे. थोडक्यात शेतकऱ्यांच्या आत्ताच्या हालअपेष्टा तशाच राहणार, पुढच्च्या जूनचा गुळ सरकारने शेतकऱ्यांच्या कोपराला लावला आहे. आत्ता आवाज करायचा नाही, असेच बहुदा सरकारला सांगायचे असावे. शेतकऱ्यांना फसवण्याचे हे खेळ बंद करा आणि अभूतपूर्व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमुक्त करा, असे आम्ही मायबाप सरकारला शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून सांगत आहोत असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. 

 

Web Title : उद्धव ठाकरे ने किसानों के लिए तत्काल ऋण माफी की मांग की, देरी नहीं

Web Summary : उद्धव ठाकरे ने जून 2026 तक ऋण माफी के सरकार के वादे की आलोचना करते हुए इसे अपर्याप्त बताया। उन्होंने संकटग्रस्त किसानों के लिए तत्काल राहत की मांग की, देरी और किसान आत्महत्याओं पर इसके प्रभाव पर सवाल उठाया। ठाकरे ने सरकार से किसानों को धोखा देना बंद करने और तत्काल ऋण राहत प्रदान करने का आग्रह किया।

Web Title : Uddhav Thackeray Demands Immediate Loan Waiver for Farmers, No Delay

Web Summary : Uddhav Thackeray criticized the government's promise of loan waivers by June 2026, deeming it insufficient. He demanded immediate relief for distressed farmers, questioning the delay and its impact on farmer suicides. Thackeray urged the government to stop deceiving farmers and provide immediate debt relief.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.