सत्तापक्ष नेत्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा
By Admin | Updated: September 9, 2014 01:16 IST2014-09-09T01:16:51+5:302014-09-09T01:16:51+5:30
महापालिकेत सत्तापक्ष नेते पदावरून भाजपमध्ये जोरात रस्सीखेच सुरू आहे. पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख

सत्तापक्ष नेत्यासाठी आणखी दोन दिवसांची प्रतीक्षा
नागपूर : महापालिकेत सत्तापक्ष नेते पदावरून भाजपमध्ये जोरात रस्सीखेच सुरू आहे. पदासाठी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व भाजपचे महामंत्री संदीप जोशी व कर निर्धारण समितीचे अध्यक्ष गिरीश देशमुख यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. सोमवारी सत्तापक्ष नेत्याविना महापौर, उपमहापौरांचे पदग्रहण झाले. या सोहळ्यात शेवटी प्रदेशाध्यक्ष फडणवीस यांनी मौन सोडले. दोन दिवास सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.
महापौर निवडीसाठी बोलाविलेल्या सभेतच सत्तापक्ष नेत्याची घोषणा केली जाईल, असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी या पदासाठी कुठलाही वाद नसून लवकरच नियुक्ती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे त्यानंतरही निवड झाली नाही. पदग्रहणापूर्वी तरी घोषणा होईल, असे वाटत होते, पण तसेही झाले नाही.
नवनियुक्त महापौर प्रवीण दटके, उपमहापौर मुन्ना पोकुलवार यांचा पदग्रहण सोहळा सोमवारी सकाळी महापालिकेत पार पडला. या सोहळ्यासाठी भाजपचे जवळपास सर्वच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लोकमतने सोमवारच्या अंकात ‘सत्तापक्ष नेत्याविना महापौरांचे पदग्रहण’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची एकच चर्चा होती. शेवटी महापौरांच्या पदग्रहणात बोलताना फडणवीस यांनी वृत्तपत्रांच्या बातम्यांचा आधार घेत, या विषयावरील मौन सोडले. फडणवीस म्हणाले, दटके यांनी सत्तापक्ष नेते पद सक्षमतेने सांभाळले. त्यामुळे त्यांच्या जागी तेवढाच सक्षम व तोडीचा नेता द्यावा लागेल.
हा सर्व विचार करून आमचे नेते याबाबतचा निर्णय घेणार असून दोन दिवसात तो जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे प्रेक्षकांच्या पहिल्याच रांगेत संदीप जोशी व गिरीश देशमुख हे दोन्ही दावेदार बसले होते. फडणवीस यांनी या विषयाला हात घालत दोन दिवसाची डेडलाईन दिल्यामुळे पुन्हा एकदा इच्छुक अधिक सक्रिय होतील, अशी चर्चा भाजप वर्तुळात रंगली होती. (प्रतिनिधी)