सुगरणीला प्रतीक्षा पावसाची
By Admin | Updated: June 1, 2015 02:52 IST2015-06-01T02:52:24+5:302015-06-01T02:52:24+5:30
पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ

सुगरणीला प्रतीक्षा पावसाची
यादव तरटे पाटील, (लेखक अमरावती येथील पक्षीतज्ज्ञ आहेत) -
पक्षी अन् पावसाच्या सरी याचं नात अजरामरच..! काही वेगळंच रसायन आहे यांच्यात. पाऊस म्हणजे श्रावणसरी. पाऊस म्हणजे गारवा. पाऊस म्हणजे हिरवळ. पाऊस म्हणजे मातीचा सुगंध. सूर्यनारायणाच्या कहराने अख्खी वसुंधरा तप्त होत असताना अचानक मान्सूनची चाहूल लागताच झाडे-झुडुपे यांच्यासकट प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना एक वेगळीच खुमारी येते. अख्खे पक्षीजीवन स्वागतासाठी सज्ज होते.
सुगरण, शिंपी, वटवट्या, नवरंग, तितर, मोर, पिवळ्या गालाची टिटवी, चातक, कोतवाल, सिरकीर मलकोहा, खंड्या, वेडा राघू, निळ्या शेपटीचा वेडा राघू, काश्मिरी नीलकंठ, नीलकंठ, हुदहुद, राखी धनेश, मलबारी धनेश, सुतार, चंडोल अशा अनेक पक्ष्यांचा विणीचा काळ हाच आहे. उन्हाळा संपायला सुरुवात होणार आणि मग मान्सूनच पाऊस येणार याच इराद्याने सालाबादप्रमाणे हे सगळे पक्षी आपल्या जोडीदारासोबत तर कधी एकटेच घरटी बनविताना दिसतात. बुलबुल, कस्तूर, कांचन, निळ्या शेपटीचा वेडा राघू तर जीवाचा आकांत करून पोट भरून नुसते खाताना दिसतात. नवीन पिढी घडविण्यासाठी मादी व नराला भरपूर ऊर्जा लागते. तसेच अंडी दिल्यानंतर पिल्लांना पण भरपूर खाद्य भरवावे लागते. ऊन जास्त असल्यामुळे पिल्लांना तापमान सहन होत नाही. किंवा काही पक्ष्यांची अंडी पण सध्याच्या जास्त उन्हात तग धरू शकत नाही. मान्सून आणि पक्ष्यांचा पाळणा यात खूप घट्ट नाते आहे.
‘पल्लवपुच्छ कोतवाल’ हा पक्षी सध्या मेळघाट जंगलाच्या वृक्षराजीत काटक्या आणि मऊ गवताचे तुकडे जमा करून घरटे तयार करीत आहेत. जमिनीपासून अंदाजे २० ते २५ फूट उंच झाडाच्या फांदीवर कपबशीच्या आकाराचे याचे घरटे असते. आता पाऊस येईल आणि लहान पिल्ले त्यातून निघेल याचा जणू संकेतच ते देत असावेत. उत्तरेकडून ‘नवरंग’ पक्ष्यांचे देखील आपल्या भागात आगमन झाले असून, हा पक्षी नदी किंवा नाल्याच्या ठिकाणी असणाऱ्या आडोशाच्या झाड-झुडपांमध्ये घरटी करण्यासाठी सध्या जागा शोधण्यात मग्न आहे. जून, जुलैमध्ये कपाच्या आकाराचे घरटे तयार करून हा पक्षी त्यात अंडी देतो. पाऊस आला की फुलपाखरे, नाकतोडे, कोळी, बेडूक, मासे, गांडूळ, चतुर अशा अनेक कीटकांची व सजीवांची संख्या वाढणार आणि मग पोटभर खायला मिळणार हाच अंदाज बांधून घरट्यांचा सगळा खटाटोप चाललेला असतो.
कावळा, चातक हे पक्षी याबाबतीत आपल्या संस्कृतीत प्रसिद्ध झाले आहेत. कावळ्याने आपले घरटे किती उंचावर बांधले यावरून पाऊस किती येईल याचा अंदाज आमचा बळीराजा घेत असतो. चातक पक्ष्याची वाट अनेक शेतकरी मोठ्या आशेने पाहतात. चातक पक्ष्याचे आगमन होणे म्हणजे पाऊस येणे हे अगदी पक्के आहे. चातक पक्ष्याला ‘रेन व्हिसीटर’ असेही म्हणतात. पावशा या पक्षाचा तर आवाजच ‘पेरते व्हा, पेरते व्हा’ किंवा ‘पाऊस आला’ असाच येतो. चला तर मग चातकाच्या येण्याची आणि पावशाने ‘पेरते व्हा’ म्हणण्याची वाट पाहू या !