हुडहुडीसाठी वाट पाहा आणखी चार दिवस; वाढलेल्या पाऱ्याने लोकांना मिळणार दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2022 07:56 IST2022-12-05T07:56:01+5:302022-12-05T07:56:35+5:30
या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.

हुडहुडीसाठी वाट पाहा आणखी चार दिवस; वाढलेल्या पाऱ्याने लोकांना मिळणार दिलासा
मुंबई : मुंबईसह राज्यभरात किमान तापमानाचा पारा पुन्हा एकदा वर चढत असून, थंडीने पळ काढला की काय असे वाटत आहे. पण हवामानातील हे बदल कायमस्वरूपी नसून, २-३ दिवसांत राज्यात हळूहळू किमान तापमानाची घसरण होऊन ९ डिसेंबरपासून पुन्हा हुडहुडी भरण्यासारखी थंडी पडण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये चांगली सुरुवात होऊनही दक्षिणेकडून अल्प आर्द्रतेचा शिरकाव व उत्तरेकडून होत असलेला थंडीचा माराही नंतर स्थिरावल्याने थंडी हिरावल्याचे चित्र आहे.
पारा ५ अंशांपर्यंत घसरणार
दीर्घावधीच्या मासिक अंदाजानुसार साधारण ९ डिसेंबरपासून महिन्याच्या उर्वरित तीन आठवड्यांत राज्यभर पहाटेच्या सुमारास किमान तापमानात सरासरीपेक्षा घट होईल. त्यामुळे थंडीची शक्यता ५५ टक्के जाणवेल. नगर व हिंगोली जिल्ह्यांत तर ही शक्यता ६५ टक्के आहे.
मराठवाड्यासह नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, तसेच वर्धा, नागपूर जिल्ह्यात दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित महाराष्ट्रात सरासरीइतके जाणवण्याची शक्यताही ५५ टक्के आहे. या जिल्ह्यांसह मराठवाड्यात दिवसा अधिक उबदारपणा, तर उर्वरित महाराष्ट्रात नेहमीसारखे साधारण वातावरण राहील, असे निवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले.