वाई हत्याकांड - अंजिराच्या झाडाखालून काढला वनिताच्या हाडांचा सापळा
By Admin | Updated: August 19, 2016 16:49 IST2016-08-19T16:49:21+5:302016-08-19T16:49:21+5:30
वाई हत्याकांडप्रकरणी वनिता गायकवाडचा खून करून कृष्णा नदीपात्रात टाकल्याचे सांगणा-या संतोष पोळने गुरुवारी घुमजाव करत वनिताचा मृतदेह धोम धरण परिसरात गाडल्याचे सांगितले होते

वाई हत्याकांड - अंजिराच्या झाडाखालून काढला वनिताच्या हाडांचा सापळा
वाई हत्याकांडातील सहाव्या खुनाचे पुरावे पोलिसांच्या हाती
आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. १९ : वाई हत्याकांडप्रकरणी वनिता गायकवाडचा खून करून कृष्णा नदीपात्रात टाकल्याचे सांगणा-या संतोष पोळने गुरुवारी घुमजाव करत वनिताचा मृतदेह धोम धरण परिसरात गाडल्याचे सांगितले होते. त्यानंतर पोलिस शुक्रवारी दुपारी साडेबाराला संतोष पोळसह फौजफाटा घेऊन धोम येथील घराजवळ पोहोचला. घरासमोरच असलेल्या अंजिराच्या झाडाखाली तब्बल 7 फूट खोदकाम करून सुमारे तीन तासांच्या प्रयत्नानंतर हाडांचा सापळा काढण्यात पोलिसांना यश आले. आता एकूण सहा जणांचे सापळे हाती आले आहेत.
धोम येथे राहणा-या वनिता गायकवाड उपचारासाठी संतोष पोळकडे जात असत. २००६ मध्ये त्याही अचानक गायब झाल्या होत्या. पोळ याला अटक केल्यानंतर वनिताचा खून करून मृतदेह धोम येथील घराजवळ गाडल्याचे संतोषने पोलिसांना सांगितले. या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी जेसीबी अन वायरमन यांच्यासह पन्नासहून अधिक पोलिस फौजफाटा घेऊन अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, वाईचे पोलिस निरीक्षक विनायक वेताळ व स्थानिक गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट शुक्रवारी दुपारी साडेबाराला संतोष पोळला घेऊन संबंधित घराजवळ पोहोचले.
( आणखी वाचा - वाई हत्याकांड - आरोपी संतोष पोळकडून पोलिसांना 'ग्रँड सॅल्यूट' )
एरव्ही दंडुका घेऊन फिरणा-या पोलिसांच्या हातात कु-हाड, करवती दिसत होत्या. संतोष पोळ याने खून केल्यानंतर ज्या ठिकाणी मृतदेह गाडला होता, तिथे अंजिराचे झाड लावले होते. ते झाड संतोषने पोसिलांना दाखविले. हे झाड दहा वर्षांत 20 फूट मोठे झाले आहे. अखेर हे झाड तोडून जमिनीखाली सुमारे तीन तास उत्खनन केल्यानंतर हाडांचा सापळा आढळून आला.