वाघदरी घाटातील दरड तीन महिने पडून!
By Admin | Updated: November 4, 2016 02:59 IST2016-11-04T02:57:14+5:302016-11-04T02:59:08+5:30
रस्त्यावर मोठं-मोठाले पडलेले दगड उचलण्यात अथवा ते दूर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही फुरसत मिळालेली नाही

वाघदरी घाटातील दरड तीन महिने पडून!
हुसेन मेमन,
जव्हार- जव्हार चालातवडहून वावर वांगणीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाघदरी घाटात जुलै महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यावर मोठं-मोठाले पडलेले दगड उचलण्यात अथवा ते दूर करण्यास सार्वजनिक बांधकाम खात्याला अजूनही फुरसत मिळालेली नाही त्यामुळे या घाटातील प्रवास जीवघेणा ठरतो आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतरच सां.बा. ला जाग येईल काय? असा प्रश्न वाहनचालक विचारत आहेत. सार्वजनिक बांधकाममंत्री शेजारच्या ठाणे जिल्ह्यातले असून त्यांना याबाबत आदेश द्यावेसे कधी वाटणार? असाही प्रश्न चर्चिला जात आहे.
जव्हार चालातवडहून वावर वांगणीकडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. वावर वांगणी, जांभुळमाथा, सारसून आदी महसूली ७ गावे व १५ पाडे असे मिळून ५ हजारापेक्षा अधिक लोकवस्ती या भागात राहत आहेत. तसेच हा रस्ता नाशिक जिल्ह्याला ओझरखेड येथे मिळतो. त्यामुळे या रस्त्यावरून सतत सर्व वाहनांची मोठी वर्दळ असते. दरड दूर करण्याबाबत सा. बां. च्या दुर्लक्षामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. वावर येथे उपप्राथमिक आरोग्यकेंद्र आहे. तर त्याचे मुख्य प्राथमिक आरोग्य केंद्र चालतवड हे आहे. त्यामुळे वावर येथील उप प्राथमिक आरोग्य केंद्रातून रोज रात्री- बेरात्री रु ग्णांना व गरोदर महिलांना घेवून चालतवड येथे यावे लागते. मात्र दरड कोसळल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
>मंत्री एकनाथ शिंदे कधी लक्ष घालणार?
पाऊस पडल्यावर या वाघदरी घाटातून वाहने चालविणे कठीण होवून अनेक वाहन चालकांवर आपली वाहने परत फिरवून माघारी जाण्याची वेळही आली आहे. वाघदरी घाटात ज्या ठिकाणी दरड कोसळली आहे. त्या ठिकाणी खाली ५ हजार फुटांपेक्षा अधिक खोल दरी आहे. त्यामुळे वाहन चालकांना काळजीपूर्वक वाहन चालवावे लागत आहे. आता पावसाळा संपला परतीचा पाऊसही संपला त्यामुळे हे महाकाय दगड व मातीचे ढिगारे आता तरी हटवावेत अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.