Vivek Phansalkar: सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 09:55 IST2022-12-18T09:54:40+5:302022-12-18T09:55:39+5:30
माेर्चा शांततेत, पोलिसांचा सुटकेचा नि:श्वास

Vivek Phansalkar: सॅल्यूट! बापासाठी मुलीचे लग्न म्हणजे... ते सोडून आयुक्त महामोर्चाच्या बंदोबस्ताला होते
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाविकास आघाडीतर्फे शनिवारी नागपाडा ते आझाद मैदान असा हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला पोलिसांनी सशर्त मंजुरी दिली होती. मोर्चा शांततेत पार पडल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. विशेष म्हणजे लेकीचे लग्न असूनही पोलिस आयुक्त विवेक फणसळकर कर्तव्यावर होते.
गेल्या काही दिवसांपासून सत्ताधाऱ्यांकडून महापुरुषांबाबत होत असलेली आक्षेपार्ह वक्तव्ये आणि राज्यातील इतर प्रश्नांवर महाविकास आघाडीतर्फे महामोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन ते अडीच हजार पोलिसांबरोबरच दोन अतिरिक्त पोलिस आयुक्त आणि १० पोलिस उपायुक्त यांच्यावर बंदोबस्ताची जबाबदारी सोपविण्यात आली होती. राज्य राखीव दलाच्या वाढीव तुकड्या आणि ड्रोनही पोलिसांच्या दिमतीला होते.
भायखळ्यातील रिचर्डसन अँड क्रुडास कंपनीपासून निघालेला मोर्चा साडेतीन किमी अंतर पार करत टाइम्स बिल्डिंगपर्यंत पोहोचला. मविआतील तीनही घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते या मोर्चाला उपस्थित होते. सुमारे ५० हजारांंहून अधिक कार्यकर्तेही मोर्चात सहभागी झाले होते. अखेरीस मोर्चा शांततेत पार पडला.
आयुक्तांचे कौतुक
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या लेकीचा शनिवारी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये विवाहसोहळा होता. मात्र, लेकीच्या विवाहसोहळ्यासाठी सुट्टी न घेता आयुक्त स्वत: कर्तव्यावर उपस्थित होते. त्यांच्या ‘आधी ड्युूटी, मग बेटी’ धोरणाचे सर्वत्र कौतुक होत होते.