सातवाहनकालीन ‘तगर’ नगरीचे घडणार दर्शन
By Admin | Updated: November 28, 2014 00:59 IST2014-11-28T00:59:10+5:302014-11-28T00:59:10+5:30
भारताचा प्राचीन इतिहास हा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. प्राचीन काळात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील देशांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावलीत.

सातवाहनकालीन ‘तगर’ नगरीचे घडणार दर्शन
आनंद डेकाटे - नागपूर
भारताचा प्राचीन इतिहास हा अतिशय समृद्ध राहिलेला आहे. प्राचीन काळात अनेक प्रगत औद्योगिक शहरे होती. विदेशातील देशांसोबत त्यांचा व्यापारही चालत असे. काळाच्या ओघात ही शहरे लोप पावलीत. काही जमिनीच्या आत गडप झालीत. प्राचीन काळातील असेच एक शहर जमिनीच्या आत गाडले गेले. उत्खननाद्वारे ते बाहेर काढून त्याचे दर्शन घडविण्यासाठी राज्य पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेतला आहे.
ते ऐतिहासिक प्राचीन औद्योगिक शहर म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातील ‘तेर’ होय. संत परंपरा लाभलेले हे स्थळ भारतातील प्राचीन प्रगत शहरांपैकी एक होते. उस्मानाबादवरून केवळ ३२.१९ कि.मी. अंतरावर असलेले ‘तेर’ हे सातवाहन काळात ‘तगरनगरी’ म्हणून विख्यात होते.
इ.स. पूर्व २ ते ३ रे शतकातील हे शहर असून तेव्हा भारताचा रोमबरोबर व्यापार चालायचा. रोममधून भारतात सोने आणि मद्य आयात केले जात होते. तर भारतातून मसाल्याचे पदार्थ निर्यात व्हायचे.
तेव्हा तगर नगरी हे भारतातील प्रमुख औद्योगिक केंद्र होते. उत्खननाद्वारे हे शहर बाहेर काढण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य पुरातत्त्व विभागाने हाती घेतला आहे. राज्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प असून यात राज्यातील संपूर्ण पुरातत्त्व विभाग मिळून काम करणार आहे.
येथील उत्खननासाठी राज्य पुरात्व विभागातर्फे केंद्रीय आॅर्कियोलॉजी सर्व्हे आॅफ इंडिया नवी दिल्ली यांच्याकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. मंजुरी मिळताच प्रत्यक्ष उत्खननाला सुरुवात होईल. राज्यातील पुरातत्त्व विभागाने उत्खननाची संपूर्ण तयारी करून ठेवली आहे.
सातवाहनकालीन तगर नगरीतील वसाहतीचा होत गेलेला विकास, विस्तार आणि इतर विविध पैलूंवर उत्खननाद्वारे प्रकाश टाकण्यात येणार आहे. हडप्पासारखे प्रगत वसाहतीचे अवशेष या ठिकाणी आढळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे तेर येथे उत्खनन करण्यात येणार आहे. त्यामुळे प्राचीन काळातील तगर नगरीचे दर्शन करण्यासाठी फार काळ वाट पाहावी लागणार नाही.