कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२४ मध्ये घडलेल्या या गुन्ह्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या होत्या. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. दरम्यान, सध्या तळोजा कारागृहात असलेल्या विशाल गवळी याने टोकाचं पाऊल उचलत तुरुंगामध्येच गळफास लावून जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. गवळी याने तळोजा कारागृहातील बाथरूममध्ये गळफास लावून जीवन संपवलं.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या असलेल्या विशाल गवळी याने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर त्याने या मुलीचा मृतदेह सुमारे १३ किलोमीटर दूर अंतरावर नेऊन टाकला होता. तसेच तो शेगाव येथे जाऊन लपला होता.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी २२ डिसेंबर रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे हलवत या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. अखेरीस दुसऱ्यादिवशी घरापासून सुमारे १३ किमी अंतरावर या मुलीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांची सहा पथके सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करत होती. ज्या परिसरात मुलगी राहत होती तेथील सीसीटीव्हीमध्ये ती परिसराच्या बाहेर पडल्याचे दिसून आले नाही. त्या अनुषंगाने पोलिसांनी आसपासच्या घरांमध्ये शोध घेतला. यादरम्यान, एका घराबाहेर ठेवलेल्या बुटांवर रक्ताचे डाग असल्याचे पोलिसांना निदर्शनास आले. ज्या घराबाहेर हे बूट होते ते घर विशाल गवळीचे असल्याचे समोर आले होते.
अशी झाली होती विशाल गवळीला अटकघटनेच्या दिवशी रात्रभर पत्नीसोबत घरात असलेला विशाल दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे साक्षीला बँकेत सोडायला गेला. तेथून तो एका जवळच्या नातेवाइकांकडे दोन-तीन दिवस राहायला जाण्याच्या उद्देशाने निघून गेला होता. नातेवाइकांकडे गेलेल्या विशालला पोलिस मागावर असल्याची कुणकुण लागताच त्याने तिथून पोबारा करत रिक्षाने डोंबिवली रेल्वे स्टेशन गाठले. तेथून लोकलने ठाण्याच्या दिशेने गेला. संध्याकाळी ठाणे स्टेशनवरून एक्स्प्रेस पकडून शेगावला गेला. प्रवासादरम्यान तो प्रवाशांकडून मोबाइल घेत नातेवाइकांशी संपर्क करत होता.शेगावला गेलेला विशाल पत्नी साक्षीच्या माहेरी न जाता लॉजवर थांबला. तेथूनही त्याने प्रकरणाची माहिती घेतली. विशाल लॉजवर थांबल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रँचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वरिष्ठांना विशालबाबत माहिती देत शेगाव पोलिसांना लॉजवर धडक देण्यास सांगितले. मात्र, तेथे विशाल आढळला नाही. त्यानंतर जवळील एका सलूनमध्ये दाढी करायला बसलेल्या विशालच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.